* बोधवाक्य लक्षवेधी
घन:शाम कुंभार
यड्राव:मोबाईलद्वारे आलेले संदेश पुढे पाठविणे एकदम सोपे आहे. ते सुविचार व चांगले वागण्याचे बोध स्वआचरणात न आणता इतरांना पाठविली जातात; परंतु महान व्यक्तीच्या प्रेरणादायी विचाराबरोबरच स्वत:चे विचार गावातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वखर्चाने लिहून प्रबोधनाचे काम येथील किशोर पडियार या युवकाने सुरू केले आहे. ती जनजागृती लक्षवेधी ठरत आहे. येथील भटक्या समाजातील किशोर पडियार हा सुशिक्षित युवक समाजात चांगले विचार रुजावेत व त्याची कृतिशीलता होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवितो. महान व्यक्तींचे चांगले विचार तसेच स्वत:ची समाजाप्रती असलेल्या सद्भावनेतून बनलेला मतप्रवाह, भिंतीवर विविध रंगाने ब्रशद्वारे रेखाटून घेत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संघटन संघर्षाचे मूलमंत्र, सिंधुताई सपकाळ यांच्या आदर्श विचारांबरोबरच स्वत:चे दारू मुक्तीसाठी, शिक्षण, आरोग्य, संस्कार, विज्ञानाविषयी, घरातील आई-वडिलांचा सांभाळ याबद्दलचे विचार प्रवाहाच्या शब्दरचनेद्वारे समाजाचे प्रबोधन करण्याची संकल्पना कृतीतून उतरवत आहे. गावातील मुख्य रस्त्यासह विविध ठिकाणी अशाप्रकारचे प्रबोधन सूर समाजात प्रबोधनासह जनजागृती येथून पुढे सुरू ठेवण्याची त्याची संकल्पना आहे.मोबाईलच्या जमान्यात भित्ती फलकाद्वारे प्रबोधनाच्या संकल्पनेचे युवा पिढीतून स्वागत होत आहे. तर हे फलक लक्षवेधी ठरत आहेत. असे विचार कृतीत उतरल्यास समाज एक चांगल्या दिशेने वाटचाल करेल.
फोटो - २००९२०२१-जेएवाय-१०
फोटो ओळी: यड्राव (ता. शिरोळ) येथील किशोर पडियार या युवकाने स्वखर्चाने भित्ती फलकाद्वारे समाजप्रबोधनाचे केलेले प्रयत्न लक्षवेधी ठरत आहेत.