राशिवडे : भोगावती साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी टाळे ठोकले. पूर्वकल्पना देऊनही ‘भोगावती’चे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले नाही, तर कार्यकारी संचालक एस. एस. पाटील हे संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या समोरून निघून गेल्याने कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत कार्यालयाला टाळे ठोकले.‘भोगावती’ ने सन २०१४/१५ या चालू गळीत हंगामातील जानेवारी १६ ते आज अखेरची शेतकऱ्यांची ऊस बिले, तोडणी-ओढणीची बिले, एफआरपीप्रमाणे १५ एप्रिलपर्यंत बँकेत जमा करावीत, मागील हंगामातील संचालक मंडळाने कबूल केल्याप्रमाणे प्रतिटन ५० रुपये देऊन वचनपूर्ती करावी, सहवीज प्रकल्पाला वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेने व सभागृहाने विरोध केला आहे, याची दखल घेऊन या संदर्भात कोणताही निर्णय संचालक मंडळाने घेऊ नये, भोगावती नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करून ‘भोगावती’ची बदनामी टाळावी, अशा आशयाचे निवेदन कारखाना प्रशासनाला संघटनेच्यावतीने देण्यात येणार होते. ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील व कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांना याबाबत पूर्ण कल्पना दिली असूनही निवेदन स्वीकारण्यास कोणीच उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे संघटनेने निषेधाच्या घोषणा देत कार्यालयास टाळे ठोकले. दरम्यान, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष केरबा पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघटनेने निषेध नोंदवून टाळे ठोकले. १५ एप्रिलपूर्वी पूर्तता करावी, अन्यथा २२ एप्रिलपासून कारखाना गेटसमोर संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.एकीकडे कारखाना सभासदांचा म्हणायचा आणि सभासद विरोधी निर्णय घेऊन मालकी गाजवायची, ही गोष्ट निंदनीय आहे. पूर्ण कल्पना देऊनही ही मंडळी भेटत नसतील, तर संघटनेची ताकद दाखवावी लागेल, असे ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील यांनी सांगितले.(वार्ताहर)संघटनेच्यावतीने निवेदन देण्यास येणार आहे, असा कोणताही निरोप मला नव्हता. अध्यक्षांकडून माहिती मिळाल्यानंतर मी दोन तास वाट पाहिली. कोल्हापूर येथे बैठकीस उशीर होत असल्याने मी निघून गेलो. उपाध्यक्ष हजर असतानाही त्यांना निवेदन दिले नाही. संचालक मंडळाची तातडीची बैठक घेऊन अशा प्रवृत्तीविरोधी फौजदारी दाखल करण्याची विनंती संचालक मंडळास करणार आहे. - एस. एस. पाटील, कार्यकारी संचालक
‘भोगावती’च्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयास टाळे
By admin | Updated: April 3, 2015 01:04 IST