उचगाव:
उजळाईवाडी (ता.करवीर) येथे गावठाण हद्दीत ८ ते १० एकर जागेत अतिक्रमण आहे. याविषयी वारंवार निवेदन देऊनही वरिष्ठ स्तरावर कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते संजय श्रीपती माने यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उजळाईवाडी गावठाणमध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अनेक ग्रामस्थांनी ८ ते १० एकर जागेत अतिक्रमण केले आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायत, मंडल अधिकाऱ्यांसह तहसील तसेच जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उजळाईवाडीची लोकसंख्या २०ते २५ हजार इतकी आहे. गावात क्रीडांगण नाही. भाजी मंडई मुख्य रस्त्यावरच उभारली आहे. त्यामुळे ज्या जागेवर अतिक्रमण आहे. ती जागा उपलब्ध झाल्यास क्रीडांगण, भाजी मंडई, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा पार्क करता येईल, तसेच सध्या गावच्या पाणंदीशेजारील नाल्यात भराव टाकून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह माजी सरंपचाचाही सहभाग आहे. यापूर्वीही याबाबत निवेदन सादर केले होते. अतिक्रमण आढळले असल्यास संबंधितावर फौजदारी करण्याचे आदेशही काढले होते. त्यावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे गावातील अतिक्रमण त्वरित थांबविण्यात यावे, अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा संजय माने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर संजय श्रीपती माने, विश्वास पाटील, नारायण माने, दगडू बागणे, दिलीप माने, रवींद्र यादव, संजय दळवी, रवींद्र गडकरी, सात्ताप्पा माने, संजय कुंभार, सुभाष चव्हाण यांच्यासह अन्य नागरिकांच्या सह्या आहेत.
कोट:
पूर्वीपासून प्रत्येकाच्या वहिवाटी आहेत. गावचा विकास व्हायला पाहिजे. यादृष्टीने नागरी सुविधामधून काम सुरू आहे. कोणाच्या मर्जीतील लोकांना जागा देण्याचा प्रश्नच नाही. खोटे आरोप करून केवळ प्रसिद्धीसाठी निवेदने काढली जात आहेत. ज्यांना ८ ते १० एकर जागेवर अतिक्रमण झाले असे वाटते त्यांनी कुठे कुठे जागा आहे दाखवावे. वस्तुस्थिती माहीत नसलेल्या लोकांकडून खोटे आरोप होत आहेत.
- सुवर्णा माने
सरपंच, ग्रा. पं. उजळाईवाडी
कोट:
माझी लढाई गावच्या विकासाच्या आड येणाऱ्या व जाणूबुजून अतिक्रमण करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. शासकीय यंत्रणा आदेश देते, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू ठेवणार आहे.
संजय श्रीपती माने
आरटीआय कार्यकर्ते,