सुनील चौगले, लोकमत न्यूज नेटवर्क
आमजाई व्हरवडे : ‘गोकुळ’च्या ठरावधारकांना दोन्ही आघाड्यांकडून उचलाउचली सुरू झाली असली तरी सहलीवर जाण्यासाठी ठरावधारक टाळाटाळ करत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यांनी आजाराची धास्ती घेतली आहे. मात्र, त्यासाठी म्हैस, गाव धार देईना, उसाला पाणी द्यायचे आहे हे सांगून जरी नेत्यांनी ऐकले नाहीतर ‘साहेब दोन दिवसापासून जरा तापच आहे,’ असे सांगून वेळ मारून नेण्याचे प्रकार सध्या घडत आहेत.
‘गोकुळ’ राजकारणाने वेग घेतला असून सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून आपणाला मानणाऱ्या ठरावधारकांना अज्ञातस्थळी हलवले जात आहे. त्यासाठी उमेदवारांसह नेत्यांची यंत्रणा सक्रिय झाली आहे. आठ-दहा ठरावधारकांना एकत्र करून पाठवण्याची तयारी केली आहे. मात्र, ठरावधारकच बाहेर जाण्यास तयार नाहीत. त्यासाठी नेत्यांना भन्नाट कारणे सांगत आहेत. ‘साहेब म्हैस, गाय धार देईना, ऊस व भुईमुगाला पाणी द्यायचे आहे,’ अशी कारणे सांगितली जात आहेत. हे सांगूनही उमेदवार जर ऐकत नसतील तर ‘साहेब दोन दिवस झाले जरा ताप आला, खोकला पण हाय’ तुम्ही म्हणत असाल तर भेटायला येऊ का? असे उत्तर दिल्यानंतर उमेदवार पुरता गारठून जातो. ‘काळजी घे, इतर कोणाच्या संपर्कात राहू नकोस’, असे सांगून उमेदवार पुढच्या गावाकडे रवाना हाेतो.
बाहेर गेलो आणि कोरोनाचा संसर्ग झाला तर काय करायचे? अशी भीती ठरावधारकांमध्ये आहे. त्यात दोन ठरावधारकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बाहेर जाण्यासाठी कोणी धाडस करेना.
म्हैस दुसरी घेऊया
अनेकजण म्हैस व गाय आपल्याशिवाय दूध देत नसल्याचे कारण सांगत आहेत. त्यांना म्हैस विकून टाक, मतदानानंतर दुसरी घेऊन देतो, असा पर्यायही सुचवला जात आहे.
याचीही ठरावधारकांना भीती
एकदा उमेदवारांच्या ताब्यात गेलो की, मतदान होईपर्यंत सोडले जाणार नाही. कोणाशी संपर्क हाेणार नाही, मग दारातून गंगा वाहते, त्याचा लाभ घेता येणार नसल्याची भीती काहींना आहे.