राजाराम लोंढे - कोल्हापूर- यंदा आॅक्टोबर ते एप्रिल या सहा महिन्यांत तब्बल २८१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्येक महिन्यात सरासरी ४०० मिलिमीटर पाऊस झाल्याने उन्हाळा की पावसाळा हेच समजेना झाले. गेल्या पाच वर्षांत वरील सहा महिन्याच्या कालावधीत पडलेल्या पावसाच्या तुलनेत यंदा चौपट पाऊस पडला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहेच पण त्याबरोबर सरकारचीही दमछाक केली. जिल्ह्याच्या पर्जन्यमानाचा अभ्यास केल्यास जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पाऊस होतो. पाऊस लांबला तर आॅक्टोबर महिन्यात एक-दोन आठवडे लागतो, त्यानंतर थंडी सुरू होते, पण अलीकडे दोन-तीन वर्षांत हवामान बदलत चालले आहे. नोव्हेंबरपर्यंत पाऊस लागल्याने शेतकऱ्यांचे वेळापत्रक बदलले. यंदा तर पावसाळ्यानंतर प्रत्येक महिन्यात पाऊस झाला आहे. आॅक्टोबर पूर्ण महिन्यात पाऊस राहिला. आॅक्टोबर महिन्यात तब्बल १४४८ मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात झाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ३६१ मिलिमीटर पाऊस झाला. शेतकऱ्यांची खरीप काढणी आॅक्टोबरपर्यंत असते. त्यानंतर रब्बीची पेरणी सुरू होते पण यंदा नोव्हेंबरपर्यंत शेतकरी खरीप काढणीतच अडकला होता. परिणामी रब्बी पेरण्या लांबणीवर पडल्या. नोव्हेंबरनंतर तरी पाऊस पाठ सोडेल असे वाटत होते, पण डिसेंबरमध्येही अवकाळी पावसाने झोडपून काढले. आठवड्याला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह गुऱ्हाळचालक, साखर कारखानदारांचे मोठे नुकसान झाले. हिवाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे थंडी जाणवलीच नाही. जानेवारी महिन्यात पाऊस थोडा कमी झाला आणि थंडीची चाहूल लागली. फेबु्रवारी महिन्यात ढगाळ हवामान राहिले आणि २८ फेबु्रवारीला जोरदार गारपीट झाली. मार्च महिन्याचा पहिला आठवडा अखंड पावसाचा राहिला. चार दिवसांत ४१८ मिलीमीटर पाऊस झाला, पावसाबरोबर गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर एप्रिल महिन्यात तर आठवड्याला पाऊस होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २७१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. एकंदरीत आॅक्टोबर ते एप्रिल महिन्यात झालेल्या पावसाची सरासरी ही जून-जुलैमधील पावसापेक्षा अधिक दिसते.गेले चार-पाच वर्षे हवामानात कमालीचा बदल होत आहे. यंदा तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. लहरी हवामानामुळे फळे, भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. - सुरेश मगदूम (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद) आॅक्टोबर ते आजअखेर झालेला पाऊस (मिमी.)महिनापाऊस आॅक्टोबर१४४८नोव्हेंबर३६१.९४डिसेंबर१२२.८८जानेवारी१०.७९फेबु्रवारी/ मार्च ४१८.२०एप्रिल१८७.७८११ मेपर्यंत२७१.०४
उन्हाळ्यातच पूर्ण झाले सरासरी पावसाचे टार्गेट
By admin | Updated: May 13, 2015 00:53 IST