तब्बल ३९७ वर्षांनी दर्शन : दोन ग्रह जवळ आल्याचा भास
कोल्हापूर : सूर्यास्तानंतर पश्चिमेला क्षितिजाच्या थोडे वर आलेल्या दोन तेजस्वी ग्रहांनी खगोलप्रेमींसाठी सोमवारची सायंकाळ पर्वणी ठरली. तब्बल ३९७ वर्षांनी अवकाशात ‘गुरू- शनि ग्रहांची महायुती’ या अतिशय दुर्मीळ अशा खगोलीय घटनेचे दर्शन खगोलप्रेमींना झाले. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आल्याचा भास पाहणाऱ्यांना झाला. खगोलप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही महायुती म्हणजे उत्तम संधी होती.
अवकाशात साेमवारी सायंकाळी दोन महाकाय ग्रहांची महायुती पाहायला मिळाली. हे दोन ग्रह परस्परांपासून फक्त ०.१ अंश (६ मिनिटे ६ आर्कसेकंद) इतक्या कमी अंतरावर म्हणजे ७३५ मिलियन किलोमीटर इतक्या अंतरावर आले होते. सप्तर्षीमधील सहावा तारा वशिष्ठ आणि त्याचा जोडीदार अरुंधती हे दोन्ही ०.२ अंश एवढ्या अंतरावर आहेत, त्यापेक्षाही निम्म्या अंतरावर हे दोन्ही ग्रह आढळले.
हे ग्रह एकत्र दिसले तरी प्रत्यक्षात गुरू ८६ कोटी किलोमीटर, तर शनि १५९ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. यापूर्वी १६ जुलै १६२३ मध्ये अशा प्रकारची महायुती पाहायला मिळाली होती. प्रत्यक्षात हे दोन्ही ग्रह १८ डिसेंबरपासूनच जवळ यायला सुरू झाले होते. रोज त्यांच्यातले अंतर कमी कमी होत होते आणि २१ डिसेंबर रोजी दोन्ही एकच असल्यासारखे दिसतील. २२ डिसेंबरपासून त्यांच्यातले अंतर वाढेल.
कोल्हापुरात खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी चंबुखडीच्या टेकडीवर, कुतूहल फौंडेशनच्या आनंद आगळगांवकर, सागर बकरे, शिवप्रभा लाड, चिन्मय जोशी, मिहीर आठल्ये, आदींनी राजारामपुरी येथील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर, हौशी खगोलप्रेमी उत्तमराव खारकांडे, शिवाजी विद्यापीठाचे राजीव व्हटकर आणि त्यांच्या टीमने पन्हाळगडावर, तसेच प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात, टेरेसवर, मसाई पठारावरही अनेक खगोलप्रेमींनी या अनोख्या ग्रहदर्शनाचा आनंद घेतला.
सोळांकूर महाविद्यालयातील प्रा. डॉ. अविराज जत्राटकर यांनी तर गिरगाव येथे शनिवारीच या महायुती दर्शनाचा आनंद मिळवून दिला. या सर्व खगोलप्रेमींनी उच्च क्षमतेचे टेलीस्कोप आणि बायनॉक्यूलरद्वारे हा महायुती सोहळा पाहिला.