कोल्हापूर : राज्यातील आशा व गट प्रवर्तक यांचे पहिले राज्य अधिवेशन शनिवारी (दि. २ आॅगस्ट) व रविवारी (दि. ३) कोल्हापुरात होत आहे. रुईकर कॉलनी येथील महालक्ष्मी मल्टिपर्पज हॉलच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात हे अधिवेशन होईल, अशी माहिती जिल्हा आशा वर्कर्सच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील व खजिनदार डॉ. सुभाष जाधव यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)च्या नेतृत्वाखाली आशा, गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचारी राज्य समन्वय समितीतर्फे हे पहिले अधिवेशन घेण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता रॅलीने सुरुवात होणार आहे. रॅली रेल्वेस्थानकांपासून अधिवेशनस्थळा पर्यंत जाणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता उद्घाटन होऊन जाहीर सभा होणार आहे. यावेळी आशा व गट प्रवर्तक यांच्या राष्ट्रीय नेत्या रंजना निरुला (दिल्ली), राज्य समन्वयक विजय गाभणे, जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा मरियम ढवळे मार्गदर्शन करणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य नेत्या शुभा शमीम व ‘आशां’च्या समस्यांच्या अभ्यासक कविता भाटिया (ठाणे) हेही उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनामध्ये आशा व गट प्रवर्तक यांच्या समस्या, आरोग्य व्यवस्था व शासनाचे धोरण, आदींबाबत चर्चा करणार आहे. विविध ठराव मांडून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहेत, असे जाधव व पाटील यांनी सांगितले.यावेळी ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सुभाष निकम, दिनकर आदमापुरे, प्राजक्ता कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, शुभांगी बेलेकर, छाया काळे, राणी यादव, उज्ज्वला पाटील, उज्ज्वला जडये आदी उपस्थित होते.
‘आशा’ वर्कर्सचे राज्य अधिवेशन कोल्हापुरात
By admin | Updated: July 30, 2014 00:29 IST