शहरातील काही मंडळांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता आपल्या गणेशमूर्ती अत्यंत साधेपणाने नेल्या. विशेष म्हणजे पावसामध्ये प्लास्टिकचे आवरण झाकून हे गणपती मंडळांकडे रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत मूर्तिकारांनीही आदल्या दिवसांपासूनच गणेशमूर्ती नेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गंगावेश, पापाची तिकटी, शाहुपुरी, बापट कॅम्प आदी परिसरात अत्यंत साधेपणाने झाकून गणेशमूर्ती नेल्या जात होत्या. दरम्यान, पापाची तिकटी येथून सायंकाळी सातच्या सुमारास अंबाबाई मंदिर गरुड मंडपातील मानाची श्री महालक्ष्मी भक्त मंडळाची गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने रथातून नेण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, एस. के. कुलकर्णी, नंदकुमार मराठे, संजय बावडेकर, संजय जोशी, तन्मय मेवेकरी आदी मान्यवर उपस्थितीत मंदिरात आगमन झाले. जुना राजवाडा येथील खजिन्यावरच्या गणपतीचेही लवाजम्यासह आगमन झाले.
फोटो : ०९०९२०२१-कोल-मंडळ गणपती
ओळी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत काही मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती अत्यंत साधेपणाने गुरुवारी सायंकाळी नेल्या.
(छाया : नसीर अत्तार)