कोल्हापूर कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून जिल्हा सावरत असतानाच आलेल्या महापुराने कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा अस्मानी संकटाशी सामना करावा लागत आहे. शहराला महापुराने विळखा घातला असून, ग्रामीण भागाची दैना उडवली आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरासह जिल्ह्यातील ४१ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राधानगरी धरणातील पाणी सोडल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होणार असून, कदाचित २०१९ पेक्षा ती गंभीर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूरजवळच्या राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची ४३ फूट पाणीपातळी धोक्याचा इशारा मानली जाते. गुरुवारी रात्री १२ वाजता ही पातळी गाठली गेली होती, तर शुक्रवारी सायंकाळी ही पातळी ५४ फुटांपर्यंत गेली होती. जिल्ह्यातील २६२ गावे पूरबाधित असून, ९,९१७ कुटुंबांतील ४१ हजार जणांना हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमध्ये राधानगरी तालुक्यातील दोन, चंदगड तालुक्यातील दोन, तर कागल तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉनर्र, जिल्हाधिकारी कार्यालय, लक्ष्मीपुरी, महावीर कॉलेज परिसर, न्यू पॅलेस पाठीमागील भाग, शुक्रवार पेठ आणि पाठीमागील भाग जलमय झाला आहे.
१२५ हून अधिक बंधाऱ्यांवर पाणी आले असून, ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाणी शिरल्याने हे कार्यालय जिल्हा परिषदेत हलवण्यात आले आहे.
कोल्हापुरात अनेक मोठ्या रुग्णालयांमध्येही पाणी गेले असून, तेथील रुग्ण हलवताना नातेवाईक, कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. भुदरगड तालुक्यातील पांगिरे येथील पुलावर गुरुवारी रात्री उशिरा अडकलेल्या ट्रॅव्हलरमधून ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील कर्नाटकच्या बसमधून गुरुवारी मध्यरात्री १५ हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली. एनडीआरएफच्या दोन टीम गुरुवारी, तर एक टीम शुक्रवारी दाखल झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पूर आणि भरलेला रंकाळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने अनेक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अखेर केवळ शासकीय वाहने आणि आपत्कालीन यंत्रणेतील वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकट
...हे आहे बंद
राज्यमार्ग १०
प्रमुख जिल्हामार्ग २९
इतर जिल्हामार्ग १०
ग्रामीण मार्ग १८
चौकट
शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथे भूस्खलन झाल्यामुळे दोन जनावरे गाडली गेली असून, मलकापूर येथील एक म्हैस वाहून गेली आहे.
चौकट
दिवसभरातील पाऊस
२३ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पडलेला पाऊस
तालुक्याचे नाव मि.मी. सरासरी पाऊस
भुदरगड २०.००
चंदगड ३२.५४
गडहिंग्लज ३२.५७
हातकणंगले ७१.४१
कागल ४०.६१
करवीर ५९.८०
पन्हाळा २४.०४
राधानगरी १२३.२९
शाहूवाडी ३९.३८
शिरोळ ३४.००