अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा मोटारीचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी तात्पुरता खंडित केला.
अर्जुनवाड ग्रामपंचायतीचे नळ पाणीपुरवठा मोटारीचे वीज बिल वीस लाखांहून अधिक थकीत आहे. याकरिता ग्रामविकास अधिकारी यांनी चार लाख रुपयांचा धनादेश महावितरणला दिला होता; पण धनादेश न वटल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे नळ पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मंगळवारपर्यंत रक्कम भरण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पूर्ववत वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
चौकट - ग्रामसेवकाचा रात्रीस खेळ चाले
ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई हे सतत गैरहजर राहतात. कार्यालयीन वेळेत ते येत नसल्याने अनेक कामे रेंगाळत आहेत, तर सायंकाळी सातच्या सुमारास ते कार्यालयात येतात. तर खात्यावर रक्कम नसतानाही त्यांनी धनादेश दिल्याने त्यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सध्या तर अर्जुनवाड ग्रामपंचायतीचा रात्रीस खेळ चाले अशी अवस्था बनली आहे.