कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहुवाडी) येथील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने पुरातत्त्व खात्याने कायदेशीर अभ्यास करून संबंधितांना नोटिसा पाठवाव्यात व पुढील कार्यवाही सुरू करावी. याबाबतीत विभागाला जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गुरुवारी दिले. यावेळी त्यांनी तहसीलदारांना परिसराचा सर्व्हे करण्यास सांगितले.
विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक विलास वहाणे, शाहुवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, कोल्हापूर वस्तूसंग्रहालयाचे मिलिंद कवितकर, गटविकास अधिकारी, वनखात्याचे अधिकारी व संघटनांचे कार्यकर्ते यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.
अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी वनखात्याची आहे असे पुरातत्त्व खात्याचे म्हणणे होते. मात्र, विशाळगड हे संरक्षित स्मारक आहे. अतिक्रमण हटवण्याची व तसेच तेथील वास्तूंचे जतन संवर्धन करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पुरातत्त्व खात्याची असल्याचे पन्हाळा तहसीलदार यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुरातत्त्व खात्याने सर्व कायदेशीर बाबी तपासून पुन्हा एकदा अतिक्रमण केलेल्यांना ३० दिवसांची नोटिसा पाठवाव्यात. स्थानिक पातळीवर बैठका घ्या, तेथील नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगा, तहसीलदारांनी या परिसराचा पुन्हा सर्व्हे करावा व झालेल्या अतिक्रमणाची यादी तपासून बघावी. ज्या दुकानदार, रहिवाशांनी, नागरिकांनी येथे अतिक्रमण केले आहे त्यांच्यासाठी काही पर्यायी जागा उपलब्ध होते का याचाही सर्व्हे केला जावा असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अतिक्रमण हटविण्याबाबत कोणकोणती कार्यवाही करण्यात येत आहे किंवा करण्यात आली याचा आढावा दर महिन्याला घेण्याचे ठरले. बैठकीला किशोर घाटगे, प्रमोद सावंत, बाबासो भोपळे आदी उपस्थित होते.
--
विकासासाठी १० कोटींची मागणी
विशाळगडावरील पुरातन मंदिरे व वास्तूंची दुरवस्था झाली आहे त्याचे जतन संवर्धन पुरातत्त्वकडून केले जावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर विलास वहाणे यांनी त्यासाठी शासनाकडे १० कोटींची मागणी केली असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन वाढीसाठी विशेष उपक्रम घ्यावेत अशी सूचना केली.
--