कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेचा (केमिकल कॉन्झर्व्हेशन) पहिला टप्पा म्हणून गुरुवारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक व पुरातत्त्व रसायनतज्ज्ञ एम. आर. सिंग व डॉ. विनोदकुमार व राज्य पुरातत्त्व खात्याचे विलास वहाने यांनी मूर्तीची पाहणी केली. पाहणीचा अहवाल येत्या चार दिवसांत डायरेक्टर जनरल यांना देणार असल्याची माहिती सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाई मूर्तीसंदर्भात केंद्राने औरंगाबादमधील केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांना अंबाबाई मूर्तीच्या केमिकल कॉन्झर्व्हेशन प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश दिले. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली. या काळात अंबाबाईचे दर्शन बंद ठेवले. तास-दीड तासाच्या पाहणीनंतर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन मूर्तीसंदर्भात माहिती दिली. यावेळी एम. आर. सिंग म्हणाले, मूर्तीचे जुने छायाचित्र पाहिले आहे. मूर्तीची सद्य:स्थिती, करावे लागणारे केमिकल कॉन्झर्व्हेशन, येणारा खर्च, कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया याचा विस्तृत अहवाल डायरेक्टर जनरल यांना चार दिवसांत देऊ. अहवालास मान्यता मिळाल्यानंतर कार्यवाहीला सुरुवात होईल. या केमिकल कॉन्झर्व्हेशन प्रक्रियेसाठी पूर्वी केलेल्या वज्रलेपाचे नमुने घेतले आहेत. अजंठा-वेरूळनंतर आम्ही १९९७ सालापासून महाराष्ट्रात काम करीत आहोत. केमिकल कॉन्झर्व्हेशन हा दीर्घकालीन उपाय आहे.यावेळी हक्कदार श्रीपूजक, देवस्थानचे सदस्य उपस्थित होते.मूर्तीची स्थिती चांगली...अंबाबाईच्या मूर्तीची अवस्था ही कोल्हापूरकरांसाठी चिंतेची बाब असली तरी सिंग यांनी ही मूर्ती बेसॉल्ट दगडापासून बनविलेली असून ती आजही चांगल्या स्थितीत असल्याचा निर्वाळा दिला. फक्त चेहरा, दंड या ठिकाणी मूर्ती दुखावली आहे. पूर्वीचा वज्रलेप निघत असल्याने मूर्तीचे अधिक नुकसान झाल्याचे जाणवते. काय आहे केमिकल कॉन्झर्व्हेशन...मूर्तीवर अभिषेक आणि सातत्याने तिला हाताचा स्पर्श झाल्याने तिची झीज होते. केमिकल कॉन्झर्व्हेशन ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात मूर्तीची कठीणता वाढविण्यासाठी आणि झीज थांबविण्यासाठी त्याच प्रकारच्या दगडाची पूड आणि काही रसायनांचा पातळसा लेप दिला जातो. वारंवार मूर्तीला स्पर्श झाला तर तो थेट मूर्तीवर नाही, तर त्या लेपावर परिणाम करतो. केमिकल कॉन्झर्व्हेशननंतर दोन-तीन वर्षांच्या अंतराने मूर्तीवर रासायनिक लेपन (केमिकल कोटिंग) करावे लागते. पंढरपुरातील विठ्ठलाच्या मूर्तीला असे कॉन्झर्व्हेशन करण्यात आले आहे.
‘पुरातत्त्व’कडून अंबाबाई मूर्तीची पाहणी
By admin | Updated: June 12, 2015 00:41 IST