मुंबई मंत्रालयात बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : यंत्रमागधारकांसाठीची वीज सवलत, कर्जावरील व्याजातील सवलत, त्याचबरोबर सहकारी सूतगिरण्यांच्या अडचणींबाबतचे प्रश्न कॅबिनेटसमोर ठेवून त्यांना मंजुरी देण्यासह अंमलबजावणी करण्यात येईल, असा निर्णय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना जाहीर केलेली ७५ पैशांची सवलत आणि २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना वीज दरात १ रुपयांची अतिरिक्त सवलत याबाबत घोषणा झाली. परंतु अंमलबजावणी झाली नाही. तसेच पाच टक्के व्याजातील सूटसंदर्भात क्लिष्ट प्रक्रिया असल्याने त्याचा तीन वर्षांत कोणाला लाभ झाला नाही. या सर्व प्रश्नांना सोडवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कॅबिनेटसमोर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
सूतगिरण्यांना प्रतिचाती तीन हजार रुपये पाच वर्षे मुदतीने दिलेल्या कर्जाची मुदतवाढ दहा वर्षे करणे. जानेवारी व फेब्रुवारी २०१९ मध्ये रखडलेल्या वीजबिलामध्ये व्याज सवलत देणे. मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना अर्थसाहाय देताना जातपडताळणीऐवजी जातप्रमाणपत्र ग्राह्य धरणे. सूतगिरण्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प प्राधान्याने राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, आदी सूचना बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीस वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे, मदन कारंडे, अशोक स्वामी व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी
१६०३२०२१-आयसीएच-०६
वस्त्रोद्योगातील समस्यांसंदर्भात मुंबई मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मंत्री हसन मुश्रीफ, जयंत पाटील व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.