दत्तवाड : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अल्पसंख्या समाजातील शाळेतून मराठी विषय शिकविण्यासाठी मानधन तत्त्वावर हंगामी शिक्षकांची नेमणूक झालेली नाही. अत्यल्प तुटपुंज्या मानधनावर जून ते मार्च अशा नऊ महिन्यांत काम करणारे या मानसेवी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे वर्ग सुरू करून शिक्षकांना नियुक्तीचे पत्र द्यावे, अशा मागणीचे निवेदन शिक्षकांच्यावतीने उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.
अल्पसंख्याक विभाग निरंतर शिक्षण विभाग व मराठी भाषा फाउंडेशन यांच्यामार्फत या मानसेवी शिक्षकांची जुलै ते मार्च महिन्यांसाठी नेमणूक केली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यात १९, तर राज्यात ९३५ मानसेवी शिक्षक आहेत. मात्र, दोन वर्षांपासून या नेमणुका झाल्या नाहीत व ऑनलाईन क्लासही सुरू झाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मानधनात वाढ करण्याचे मान्य केले होते; पण सध्या नेमणूक नसल्याने ना नेमणुका ना मानधन अशा चक्रव्यूहात हे शिक्षक सापडले आहेत. त्यामुळे हे वर्ग सुरू करून शिक्षकांना नेमणुकीचे पत्र द्यावे, अशी मागणी होत आहे
फोटो - १९०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जिल्ह्यातील मानसेवी शिक्षकांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.