शिरोली : ६५ वर्षांच्या आतील व्यक्तीस ज्येष्ठ नागरिकाचे ओळखपत्र न देण्याचा नियम असला तरी पुलाची शिरोलीत आज, रविवारी केवळ २०० रुपयांत ५० वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र देण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हसूर दुमाला येथील सर्जेराव शंकर सावर्डे व दिनकर लाड या दोघांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. त्यांच्याविरोधात शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.श्री स्पंदन साहित्य सांस्कृतिक व सामाजिक सेवा संस्था बिद्री, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉम) संलग्न संस्थेमार्फत हे ओळखपत्र काढून देण्याचे काम हे दोघे करीत होते. संपूर्ण जिल्हाभर त्यांनी १० ते १२ तरुण या कामासाठी लावले आहेत. दोन दिवसांपूर्वी दिनकर लाड व सर्जेराव सावर्डे हे शिरोली ग्रामपंचायतीमध्ये ओळखपत्र काढण्याची परवानगी घेण्यासाठी आले होते. पण सरपंच व ग्रामसेवक यांनी परवानगी दिली नाही. तरीही ते दोघे गेल्या दोन दिवसापासून शिरोली गावात ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र काढून दिले जाईल असे माईकद्वारे रिक्षातून पुकारत होते. केवळ २०० रुपयांत घरपोच ओळखपत्र मिळेल, असा प्रसार त्यांनी केला होता. आज, रविवारी त्यांनी ग्रामपंचायत चौकातील महादेव मंदिरात सकाळी १० वाजता नागरिकांकडून प्रत्येकी २०० रुपये घेऊन फॉर्म देण्यास सुरुवात केली. संबंधित नागरिकांनीही दोन फोटो देऊन फॉर्म भरून दिला. पण या फॉर्मबरोबर कोणतेही ओळखपत्र, जन्माचा दाखला, रहिवासी दाखला या लोकांकडून घेतला नव्हता व २०० रुपयांची कोणतीही पावती दिली नव्हती. याचवेळी या परिसरातून जात असलेले इचलकरंजी एस. टी. डेपोचे अधिकारी संजय पाटील यांना हा प्रकार दिसला. त्यांनी या दोघांना जाब विचारला. यावर त्यांनी आमची संस्था काढून देते, असे उत्तर दिले. त्यानंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे जिल्हाप्रमुख दीपक यादव व सहकारी महादेव मंदिरात आले. त्यांनी कागदपत्रे, रजिस्टर, तयार केलेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र पाहिले असता ४०, ४५ व ५० वर्षांच्या नागरिकांना या टोळीच्या लोकांनी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र दिल्याचे निदर्शनास आले. यानंतर शिरोली गावातील नागरिकांनी सावर्डे व लाड यांना शिरोली पोलिसांत नेले. येथे दोघांचे साथीदार संदीप साठे व युवराज सावर्डे हे आले व त्यांनी आमचे चुकले, माफ करा, अशी विनवणी केली. पण शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने तक्रार देणारच असे सांगितले. यावर शिरोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक के. पी. यादव यांनी सोमवारी सर्व कागदपत्रांसह पोलिसांत हजर राहण्यास सांगितले. यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख अभिनंदन सोळांकुरे, माजी सरपंच तात्यासाहेब पाटील, लियाकत गोलंदाज, सचिन यादव, अविनाश यादव उपस्थित होते. (वार्ताहर)ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र काढण्यासाठी हातकणंगले तहसील कार्यालयातून अथवा मी कोणालाही परवानगी दिलेली नाही. ओळखपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात सेतू विभागात सोय आहे. नागरिकांनीही असे रस्त्यावर येणाऱ्या लोकांना व योजनांना भुलू नये.- दीपक शिंदे, तहसीलदार, हातकणंगले.ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र हे ६० वर्षे वयावरील लोकांना रेल्वेसाठी, तर ६५ वर्षे वयावरील लोकांना एस. टी. साठी वापरता येते. पण हे ओळखपत्र काढून देणारे ४० ते ५० वयाच्या लोकांना ६५ वय लावून व २०० रुपये घेऊन बोगस ओळखपत्र काढून देण्याचे काम शिरोलीत चालले होते. - संजय पाटील, इचलकरंजी एस. टी. डेपो अधिकारीश्री स्पदंन साहित्य सांस्कृतिक सामाजिक सेवा संस्था ही मी स्वत: स्थापन केली असून, दोन वर्षांपूर्वी मी ५० रुपयांत घरपोच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र लोकांना दिली, पण कोणताही बोगस प्रकार केलेला नाही. पण सध्या दीड वर्षांपासून माझ्या संस्थेमार्फत ओळखपत्र काढून देण्याचे काम बंद आहे. या लोकांशी माझा संबंध नाही. त्यांनी संस्थेच्या पदाचा गैरवापर केला आहे. - संजय पाटील, बिद्री-अध्यक्ष श्री स्पंदन सांस्कृतिक संस्था१) शिरोली येथे ६५ वर्षांच्या आतील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र देण्याचा प्रकार उघड झाला. पैकी महिलेला दिलेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, तसेच त्यावर असलेला शासकीय अधिकाऱ्यांचा सही व शिक्का. २) ओळखपत्र देताना जमा केलेली रक्कम जप्त केली.
२०० रुपयांत कोणीही ज्येष्ठ नागरिक
By admin | Updated: November 10, 2014 00:45 IST