कोल्हापूर : निम्म्या किमतीने वस्तू देण्याचे आमिष दाखवून त्या बदलात गिफ्ट कार्ड देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अटकेतील संशयित आविष्कार सुनील पाटील (वय २९, रा. वरळी, मुंबई) याच्याविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात आणखी एक फसवणुकीची तक्रार दाखल झाली. नोकरी लावतो म्हणून त्याने ५ लाख ८० हजार रुपये घेऊन दोघा भावांची फसवणूक केल्याची तक्रार सचिन बंडू जाधव (वय २१ रा. केव्हीज पार्क, कोल्हापूर. मूळ रा. खोपटी तंडा-जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी पोलिसांत दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईतील संशयित सुनील पाटील व आविष्कार पाटील या पिता-पुत्रांनी कोल्हापुरात अनेकांचा विश्वास संपादन करून त्यांना मॉलचे गिफ्ट कार्ड दिले. त्यातून फसवणूक झाली. त्यांनी सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत १४ लाखांना गंडा घातल्याच्या तक्रारी शनिवारी (दि. ९ जानेवारी) शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्याप्रकरणी आविष्कार पाटील या संशयितास अटक केली आहे. संशयिताने नोकरीचे आमिष दाखवून काहींची फसवणूक केल्याचेही तपासात पुढे आले आहे.
दरम्यान, संशयित आविष्कार पाटील याने बालभारतीमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो म्हणून विश्वास संपादन करून सचिन बंडू जाधव व त्याचा चुलत भाऊ विकास पांडू जाधव या दोघांची फसवणूक केल्याची तक्रार सोमवारी शाहुपुरी पोलिसात दाखल झाली. संशयित आविष्कार याने सचिन जाधव याच्याकडून गुगल पे, आरटीजीएस व रोखीने असे सुमारे ५ लाख ८० हजार रुपये स्वीकारून सचिन व त्याचा चुलत भाऊ विकास जाधव यांना नोकरी न लावता त्यांची पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.