कवठेमहांकाळ : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त सोमवारी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या गंगावेस तालमीच्या अण्णा कोळेकरने अवघ्या दोन मिनिटात सांगलीच्या पवार तालमीच्या संभाजी सुडकेस हिस्सा डावावर आस्मान दाखवत ‘देशिंग केसरी’ किताब व एक लाखाचे इनाम पटकावले.मैदानाचे उद्घाटन देशिंग मठाचे गुंडीबुवा महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. प्रथम क्रमांकाची कुस्ती दिल्लीचा मल्ल हितेशकुमार गुरू न आल्याने, संभाजी सुडके व अण्णा कोळेकर यांच्यात रात्री पावणेनऊला जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, गणपती सगरे, रोहित पाटील, अजित कारंडे यांच्याहस्ते लावण्यात आली. आक्रमक पवित्रा घेतलेल्या कोळेकरने सुडकेला ताकद आजमावण्याचीही संधी दिली नाही. गर्दन खेच करीत त्याने सुडकेला खाली घेतले व अवघ्या दोन मिनटात हिस्सा डावावर अस्मान दाखवले. कोळेकरला त्याच्या समर्थकांनी उचलून घेत जल्लोष केला. त्याला ‘देशिंग केसरी’ किताब व एक लाखाचे इनाम सुरेश पाटील, गणपती सगरे, रोहित पाटील यांच्याहस्ते देण्यात आले.दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती गंगावेसच्या सचिन जामदार विरुध्द मोतीबागचा कपील सरगर यांच्यात झाली. ही कुस्ती वीस मिनिटे चालली. दोघे ही तोडीस तोड असल्याने अखेर कु स्ती बरोबरीत सोडवण्यात आली. तृतीय क्रमांकाची कुस्ती वसंतदादा कारखान्याचा मल्ल दादा धडस विरुध्द गंगावेसचा जयपाल वाघमोडे यांची कुस्तीही बरोबरीत सोडवण्यात आली. चौथ्या क्रमाकांची देशिंगचा युवराज वावरे विरुध्द गोकु ळ तालमीचा अजित चौगुले यांच्यातील कुस्ती प्रेक्षणीय झाली. आपल्यापेक्षा बलदंड चौगुलेस युवराजने अवघ्या एका मिनिटात हफ्ते डावावर चितपट केले व पन्नास हजाराचे इनाम पटकावले. अन्य निकाल : मंथन बंडगर (विजयी) विरुध्द अनिल कोळेकर, नितीन वावरे( विजयी) विरुध्द सचिन मदने, संकेत डुबुले (विजयी) विरुध्द स्वप्नील सरडे.शंकर पुजारी यांनी निवेदन केले, तर बहाव कारंडे, तालीम संघाचे सचिव प्रा. गावडे, शंकर सावंत, संतोष वेताळ यांनी पंच म्हणून काम पाहिले. मैदानासाठी हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते. अमित कोळेकर, आप्पासाहेब कोळेकर यांनी मैदानाचे संयोजन केले. (वार्ताहर)
अण्णा कोळेकर ‘देशिंग केसरी’चा मानकरी
By admin | Updated: May 12, 2015 23:41 IST