जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणाच्या रेंगाळलेल्या कामाच्या निषेधार्थ आज, सोमवारी जयसिंगपूर येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला. सुमारे एक तास आंदोलन सुरू राहिल्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आज सकाळी दहाच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यानंरत अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, सांगली-कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरण काम अर्धवट राहिल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडली, पण ठेकेदार व राज्य सरकारला याचे काहीच सोयरसुतक नाही. जनतेला हा रस्ता उत्कृष्ठ स्वरूपात उपलब्ध होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता खलिपे यांना निवेदन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी रमेश यळगुडकर, विठ्ठल पाटील, राजेंद्र दार्इंगडे, मिलिंद भिडे, सुनील शर्मा, आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात मोहनराव कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, जैनुद्दीन अत्तार, प्रमोद आपटे, दीपक आणेगिरीकर, रमेश यळगुडकर, राजेंद्र दार्इंगडे, संतोष कुलकर्णी, मिलिंद भिडे, शैलेंद्र गाडे, किरण कुलकर्णी, नंदकुमार कदम, विनय पाटील, राजू निर्मळे, महिला आघाडीच्या शिल्पा पाटील, रागिणी शर्मा, मनीषा यळगुडकर, शोभा दार्इंगडे, शकुंतला पवार, आण्णा दळवी, आण्णासाहेब पोवार, गणेश जाधव, संतोष कांबळे, मल्लू खामकर, भीमा चव्हाण, आनंदा घाटे, मयूर सावंत, आस्लम मुजावर, पिंटू कोळी, उमर सैय्यद, विनायक पाटील आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको-जयसिंगपूर भाजपच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
By admin | Updated: August 25, 2014 22:10 IST