कागल : करनूर (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री मरीआई देवी आणि हुजरत गैबी पीर यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात शाहू साखर कारखान्याचा मल्ल अनिल चव्हाण याने मुरगूडच्या सतीश आडसूळवर घुटना डावाने विजय मिळविला. या स्पर्धेत लहान-मोठ्या मिळून १०५ कुस्त्या लावण्यात आल्या.प्रथम क्रमाकांच्या या कुस्तीमध्ये अनिल चव्हाण सुरुवातीपासूनच आक्रमक होता. त्याने पट काढण्याचा प्रयत्न केला. एकेरी पट काढीत सतीश आडसूळला खाली घेतले. शेवटी घुटना डावावर त्याला चितपट केले. द्वितीय क्रमांकाच्या तानाजी कुऱ्हाडे (शाहू साखर) व कृष्णात कांबळे (दऱ्याचे वडगाव) यांच्यातील कुस्तीचा उशिरापर्यंत निकाल न लागल्याने ती सोडविण्यात आली. या स्पर्धेत गजानन पाटील, शुभम पाटील (बाणगे), संतोष मेटकर, अमोल बोंगार्डे (बाणगे), नेताजी भोसले (गोरंबे), शहाजी पाटील (हदनाळ), स्वागत पाटील (खेबवडे), सर्जेराव धनगर (करनूर), प्रसाद पाटील (गोरंबे), आदींनी चटकदार कुस्त्या केल्या. पंच म्हणून ईश्वर भोसले, शिवाजी जमनिक, साताप्पा मगदूम, हिंदुराव पाटील यांनी, तर राजाराम चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ आणि बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी नवीद मुश्रीफ, मोहन जाधव, प्रकाश सांगावकर, रमेश लालवाणी, विकास पाटील, इम्रान नाईकवडी, अमित पवार, तातोबा चव्हाण, यात्रा कमिटीचे अध्यक्ष भाऊसोा नलवडे, मानसिंग पाटील, अशोक शिरोळे, बाळासो पाटील, सुनील गुदळे, सचिन घोरपडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अनिल चव्हाणची सतीश आडसूळवर मात
By admin | Updated: April 12, 2015 23:58 IST