राजाराम पाटील --ल इचलकरंजी -चंदूर (ता. हातकणंगले) येथील शाहूनगरमधील श्री शुभ आशीर्वाद महिला बचत गटाने आर्थिक पत निर्माण केल्याने रंजना रवींद्र वेळापूरकर या महिलेचे यंत्रमाग कापड उत्पादक उद्योजिका बनण्याचे स्वप्न साकार झाले आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅँकेच्या अर्थसाहाय्यामुळे वेळापूरकर कुटुंबीय महिन्याला दहा लाख रुपयांच्या सूत खरेदी व कापड विक्रीची उलाढाल करीत आहेत.शाहूनगरमधील गल्ली नंबर चार परिसरातील १५ महिलांनी १५ आॅगस्ट २०१० रोजी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर श्री शुभ आशीर्वाद महिला बचत गटाची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षा रंजना वेळापूरकर, उपाध्यक्षा उज्ज्वला बसवराज डोनवडे, तर सचिव संगीता विजयकुमार महिंद होत्या. त्यांनी प्रथम ५० हजार, त्यानंतर एक लाख व दोन लाख रुपये असे घेतलेले अर्थसाहाय्य अगदी वेळेत फेडले. त्यातूनच या महिलांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढला. रंजना वेळापूरकर यांनी यंत्रमागावर स्वत: कापड उत्पादन करण्यासाठी आवाडे जनता बॅँकेकडे अर्थसाहाय्य मागण्याचे ठरविले आणि बचत गटातील त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली.वेळापूरकर यांनी दहा यंत्रमागांवर कापड उत्पादनासाठी जून २०१४ मध्ये सव्वा दोन लाख व त्यानंतर जुलै-आॅगस्टमध्ये सव्वा दोन लाख असे साडेचार लाख रुपये कर्ज घेतले. सुताची सायझिंग कारखान्यातून बिमे तयार करून त्यावर स्वत:च्या यंत्रमाग कारखान्यात कापड निर्मिती व त्यातून निर्माण झालेले कापड विक्री, असे त्यांचे उलाढालीचे चक्र आहे. सध्या त्यांच्या यंत्रमागावर तयार होणारे कापड विक्री झाल्यानंतर त्यातून परकर, हाफ पॅँट, गाऊन अशा विविध वस्त्रांची निर्मिती होते.स्वत:च्या यंत्रमाग कारखान्यात रंजना व त्यांचे पती रवींद्र वेळापूरकर हे दोघे आठ तास काम करतात. सासू मंगल वेळापूरकर या कांड्या भरण्याचे काम करतात. तर दीर अमोल वेळापूरकर हे सूत खरेदी आणि कापड विक्री यांचे काम पाहतात. त्यांच्या कारखान्यामध्ये आणखीन दोन कामगार यंत्रमागावर कार्यरत असून, त्यांच्याशिवाय इतर सर्व कामे वेळापूरकर कुटुंबीयांकडून केली जातात. त्यामुळे त्यांना स्वत:च्या कष्टाच्या मोबदल्याबरोबर चांगला नफाही मिळतो. त्यामुळे आम्ही समाधानी असल्याचे रंजना वेळापूरकर यांनी सांगितले.व्यवसाय वाढविण्याचा निर्धारवेळापूरकर कुटुंबीयांनी आता आणखीन आठ मागांवर जॉबवर्क पद्धतीने सुताची बिमे देऊन कापड विणून घेण्याची तयारी केली आहे. परिणामी त्यांच्या उलाढालीमध्ये वाढ होणार असल्याने त्यांनी बॅँकेकडे अर्थसाहाय्य आणखीन वाढवून देण्याची मागणी केली आहे. सर्व कुटुंबीय यंत्रमागावर कार्यरत असल्याने त्यांनी अल्पावधीतच व्यवसाय वाढविण्याचे निश्चित केले आहे.
...अन् वेळापूरकर बनल्या उद्योजिका
By admin | Updated: January 20, 2015 00:53 IST