कोल्हापूर : गणपती बाप्पांपाठोपाठ आज घरोघरी येणाऱ्या गौराईसाठी अंबाबाईच्या प्रसादाच्या साड्यांच्या विक्रीला पहिल्याचदिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ऐन सणात महिलांना अंबाबाईची साडी खरेदी करता यावी, यासाठी देवस्थान समितीने सुरू केलेल्या या उपक्रमात शनिवारी १५० साड्यांची विक्री झाली.
अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी वाहिलेल्या १५ हजार साड्या सध्या देवस्थान समितीकडे आहेत. या साड्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनादेखील मिळावा, यासाठी समितीच्यावतीने शनिवारपासून त्र्यंबोली टेकडी येथे साडी विक्री सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला पहिल्याचदिवशी कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद देत १५० साड्यांची खरेदी केली. यात ५ वार, ६ वार व ९ वार साड्यांचा समावेश आहे. या उपक्रमाचे उदघाटन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी धर्मादाय उपायुक्त चौधरी यांच्याहस्ते प्रसाद साडी कुपन वाटप करण्यात आले, सहायक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे यांच्याहस्ते साडी विक्रीचा प्रारंभ करण्यात आला.
या साड्यांची दुकानदारांना विक्री होऊ नये, व्यवहारात पारदर्शकता असावी, यासाठी ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक घेण्यात आला आहे. तसेच त्यांना देण्यात आलेल्या साडीच्या क्रमांकाची नोंद ठेवण्यात येत आहे. साड्यांचा स्टॉक संपेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. यावेळी व्यवस्थापक धनाजी जाधव, उप भियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, मिलिंद घेवारी व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
--
फोटो नं ११०९२०२१-काेल-अंबाबाई साडी
ओळ : कोल्हापुरातील त्र्यंबोली टेकडी येथील देवस्थान समितीच्या कार्यालयात शनिवारपासून अंबाबाईच्या प्रसादाच्या साड्यांची विक्री सुरू करण्यात आली. पहिल्याचदिवशी महिलांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---