इंदुमती गणेश,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसींचा आधीच जिल्ह्यात तुटवडा असताना १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस कशी देणार, असा प्रश्न आता प्रशासनापुढे आहे. कोरोनाचा कहर वाढल्याने सध्या शहर-जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा लागल्या आहेत. अशा स्थितीत १ मे पासूनच्या लसीकरणाचे नियोजन करणे हे यंत्रणेपुढील आव्हान असणार आहे.
गेल्या महिन्याभरापासून राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आता नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होत आहे. सुरुवातीला गैरसमजातून केलेल्या दुर्लक्षामुळे आता सगळ्याच लसीकरण केंद्रांबाहेर लांबलचक रांगा लागल्या आहेत. वादावादीचे व गोंधळाचे प्रसंग निर्माण होत आहेत. मागील काही दिवसांत तर सातत्याने लसीचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे. शिवाय ठरविल्याप्रमाणे यंत्रणेला आपले लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. काही केंद्रे तर लस नसल्याने बंद ठेवावे लागले आहेत.
एकीकडे ही परिस्थिती असताना कोरोनाचा संसर्ग तरुण पिढीतही मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्य शासनाने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींनाही लस देण्याचे जाहीर केले आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींचे अजून लसीकरण पूर्ण झालेले नसताना १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण कसे पूर्ण करणार, त्यासाठी केंद्रे वाढवणार का, एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार आहे का, असे अनेक प्रश्न आरोग्य यंत्रणेलाही पडले आहेत. त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
--
४९ टक्के लसीकरण पूर्ण
सध्या जिल्ह्यातील ७ लाख ७८ हजार ०११ नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर ८५ हजार ७१९ लोकांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. ही संख्या जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टाच्या ४९ टक्के इतकी आहे.
---
जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्रे : ३०५
रोजच्या लसीकरणाचे उद्दिष्ट : ४० हजार
प्रत्यक्षात रोजचे लसीकरण : ३० हजार
---
७१ हजार लस मिळणार
नुकतेच जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने सोमवारी शहर-जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्र सुरू होती. पुढील काही दिवसांत लसीचे आणखी ७१ हजार डोस जिल्ह्याला मिळणार आहेत.
---
उत्पादन, पुरवठा आणि केंद्रेही वाढवावी लागणार ...
एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणासाठी लसींचे उत्पादन आणि सर्व जिल्ह्यांना होणारा लसींचा पुरवठाही वाढवावा लागणार आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर आत्ताच मोठी गर्दी होत असल्याने १८ वर्षांवरील लसीकरण सुरू झाल्यावर केंद्रांची संख्यादेखील वाढवावी लागणार आहे.
--
आज बैठक
१ मे पासून लसीकरण यंत्रणा कशी राबवायची याबाबत प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. त्यावर आज, मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार असून त्यात सर्व बाबी स्पष्ट होतील.
डॉ. फारुख देसाई
जिल्हा लसीकरण अधिकारी
--