कोल्हापूर : शहरातील सराफी दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या १५ एप्रिलपासून सराफी दुकाने बंद आहेत. यामुळे फक्त सराफ व्यावसायिक नाही तर यावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांनाही मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहेत. आम्ही सर्व सराफ व्यावसायिक सॅनिटायझर, मास्क व सुरक्षित अंतराबरोबर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आहोत. इतकेच नाही तर दुकानात मुळात ग्राहकांची संख्याही मर्यादित असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका पर्यायाने कमी आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून आम्हाला दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, असा आग्रह निवेदनात धरण्यात आला आहे.
शासनाच्या विविध करांबरोबरच तीन महिन्यांचा जीएसटी कर, तीन महिन्यांचे वीज बिल, पाणी बिल, घरफाळा माफ करण्याबरोबरच बँक कर्जाच्या व्याजामध्ये सवलत द्यावी, अशा मागण्यांचाही सहानुभतीपूर्वक विचार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.