सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर शहर हे स्वतंत्र युनिट करून येथील सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गेल्या आठवड्यात पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे केली होती. आमच्या मागणीबाबत राज्य शासन कोणताही निर्णय घेवू दे आम्ही सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करणार असल्याचा इशारा या व्यापारी, व्यावसायिकांनी दिला होता. त्यानंतर राजारामपुरी, महाद्वार रोड परिसरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राजारामपुरी आणि महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनने शनिवारी घेतला. कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाच्या नव्या नियमावलीची प्रतीक्षा या सर्व व्यापारी, व्यावसायिकांना लागली होती. जिल्ह्यातील निर्बंध ‘जैसे-थे’ राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ‘कोल्हापूर चेंबर’च्या शिवाजीराव देसाई सभागृहात रविवारी दुपारी व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये सर्व संलग्नित संघटनांच्या अध्यक्षांसमवेत चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळेत उघडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. गेल्या आठवड्यातील कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट ७.५८ टक्के, तर बेडची उपलब्धता ४२ टक्के आहे. या निकषाप्रमाणे कोल्हापुरातील सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळणे अपेक्षित होते. पण, राज्य शासनाने निकषामध्ये बदल केला. आरटीपीसीआरचा पॉझिटिव्हिटी रेट यासाठी धरावा, असा नवीन निकष लावला. शासन दरवेळी असे निकष बदलत राहिले, तर कोल्हापूरमधील व्यापार कधीच सुरू होणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करत सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या निर्णयानुसार सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्याचे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.
या बैठकीस उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, सचिव धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, संचालक प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, ग्रेन मर्चंटसचे अध्यक्ष अभयकुमार अथणे, जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धडाम, कॉम्प्युटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पुणेकर, ऑटोमोबाईल्स स्पेअर पार्टस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण शहा, पान मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत, ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे संजीव चिपळूणकर, धर्मपाल जिरगे, अतुल शहा, जुगल माहेश्वरी, विक्रम निस्सार, सीमा जोशी, प्रसाद नेवाळकर, अविनाश नासिपुडे, विजय नारायणपुरे आदी उपस्थित होते. सचिव जयेश ओसवाल यांनी आभार मानले.