कोल्हापूर : ‘उदं गं आई..ऽ उदं..ऽऽ’चा गजर, भंडाऱ्याची उधळण, पालखी सोहळा, देवीची पारंपरिक सालंकृत पूजा,.. वडी, भाजी, भाकरी, अंबीलची नैवेद्य आरती, मानाच्या जगांपुढे नतमस्तक होत आज, शनिवारी ओढ्यावरील रेणुका देवीची अंबील यात्रा संपन्न झाली. रेणुका देवस्थान समितीने केलेल्या आवाहनामुळे होर्डिंगमुक्त यात्रेचा अनुभव घेत भाविकांनी सहभोजन आणि खरेदीचा आनंद लुटला. सौंदत्ती यात्रेनंतर आठ दिवसांनी ओढ्यावरील रेणुका देवीची आज यात्रा झाली. यानिमित्त पहाटे तीन वाजता अभिषेक करून पुजारी सुनील मेढे मदनआई जाधव यांनी देवीची सालंकृत पारंपरिक पूजा बांधली. तत्पूर्वीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या. दुपारी देवीच्या पालखीने मंदिराला पाच प्रदक्षिणा मारून विधी पार पडला. रात्री ९ वाजता मानाचे जग आपल्या घरी रवाना झाले. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून मंदिरात जाण्याआधीच देवीचा व पालखीचा नैवेद्य स्वीकारला जात होता. मैदानात मागील बाजूला मांडवात मानाचे तीन जग ठेवले होते. करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना, लोखंडे परिवाराच्यावतीने अंबील वाटप केले. रेणुका परिसर भक्त मंडळासह आमदार राजेश क्षीरसागर, विजय देवणे यांच्यावतीनेही मांडप उभारुन सरबत वाटपाची सोय केली होती. गोखले कॉलेजजवळ अष्टविनायक ग्रुपच्यावतीने प्रसादाचे वाटप केले जात होते. (प्रतिनिधी)
‘उदं गं आई..ऽ’चा गजर, भंडाऱ्याची उधळण
By admin | Updated: December 14, 2014 00:53 IST