निपाणी : कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मल्लय्या डोंगरावरील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवाची श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारीची मुख्य यात्रा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली.मंदिरात पहाटेपासून यात्रेनिमित्त अभिषेक, विधीवत पूजा, मंत्रस्त्रोताचे पठण, आरती असा धार्मिक सोहळा पार पडला. मध्यरात्री १ वा. पासून ३ वा. पर्यंत शिवलिंगास बेल वाहण्याचा कार्यक्रम झाला. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर ११ हजार बेल वाहिले जातात. बेल वाहण्याच्या कार्यक्रमानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यात्रा कमिटीने भाविकांच्या दर्शनासाठी चांगली सोय केली होती. तसेच कोल्हापुरातील ज्योतिबा ग्रुपतर्फे सर्व भाविकांना शाबुच्या खिचडीचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष सुनील कोरडे, कल्लाप्पा पात्रावळे, सचिव देसाई, आदीं कार्यरत होते. बेनाडीतील मल्लिकार्जुन युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भक्तांसाठी मोफत चहाचे आयोजन केले होते. भाविक आप्पाचीवाडी फाटामार्गे तसेच आडी गावातील मार्गाने येत होते. त्यासाठी कागल व निपाणी आगाराने यात्रा विशेष बसचे नियोजन केले होते. यात्रा काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी निपाणीचे सीपीआय महेश्वरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार हळ्ळूर व सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गोवा, कोकण विभागासह कोल्हापूर, सांगली, बेळगाव, आजरा, मुरगूड, इचलकरंजी, कागल, हुपरी, चिकोडी, निपाणी आदी भागातून हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)
आडी मल्लय्याच्या यात्रेत ‘हर हर महादेव’चा गजर
By admin | Updated: August 11, 2014 22:42 IST