कोल्हापूर : अजोड शिल्पकृतींचा नमुना असलेल्या अजिंठा आणि वेरूळ येथील शिल्पकृतींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आज, सोमवारपासून येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनामध्ये सुरू झाले आहे़ इचलकरंजी येथील गजानन पारनाईक यांनी ही शिल्पे कॅमेराबद्ध केलेली आहे़ अजिंठा आणि वेरुळमधील एकाहून एक सुरेख अशा सुमारे ५० शिल्पकृतींची छायाचित्रे या दालनात आहेत़ शिल्पकलाप्रेमी आणि शहरातील महाविद्यालयीन युवक-युवतींना समृद्ध लेण्यांचे दर्शन सात डिसेंबरपर्यंत विनाशुल्क उपलब्ध आहे़ सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे़ या चित्रप्रदर्शनात वेरूळ येथील कैलास मंदिर, गजलक्ष्मी, मदन व रती, शिवपार्वती विवाह, रावणानुग्रह, शिवपूर्ती तसेच जैन लेणी व पार्श्वनाथ मंदिर, चैत्यगृह, प्रसन्नचित्त बुद्ध, शैव वैष्णव, बोधीवृक्ष, स्तुप विहार आदींच्या शिल्पाकृतींचा समावेश आहे तसेच अजिंठा येथील पद्मपाणी, जैन आणि बौद्ध तसेच भगवान महावीर लेण्यांच्या अनेक चित्रकृतींचाही समावेश आहे. कलाप्रेमींनी या प्रदर्शनाचा आनंद लुटावा, असे आवाहन पारनाईक यांनी केले आहे़
अजिंठा-वेरुळ लेणी चित्रप्रदर्शन सुरू
By admin | Updated: December 2, 2014 00:18 IST