कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना शहरवासीयांसाठी महत्त्वाची आहे. योजनेस विलंब झाल्याने याचा आर्थिक भार शेवटी महापालिकेवरच पडणार आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्याने महासभेची आवश्यकता नाही. योजनेला फाटे न फोडता योजना मार्गी लावा, असे स्पष्ट आदेश आज सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौर सुनीता राऊत यांना दिले.शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत पवार यांनी थेट पाईपलाईनचे काम कुठंवर आले आहे? ठेकेदाराने राज्यात कुठे काम केले आहे? आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? काम का रखडले आहे? असा सवाल उपस्थित केला. यानंतर जल अभियंता मनीष पवार यांनी योजनेची माहिती देऊन महासभा झाल्यानंतरच वर्क आॅर्डर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पवार म्हणाले, गेल्या तीन दशकांचे शहरवासीयांचे स्वप्न असणारी ही योजना प्रत्यक्षात साकारत आहे. निव्वळ निविदा प्रक्रियेत योजना अडकवून ठेवू नका. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर विशेष सभेची काहीच आवश्यकता नाही. योजना पारदर्शी राबविल्यास शंकेला वावच राहणार नाही. योजनेस जितका विलंब कराल, तितक्या जनतेच्या मनात शंका उपस्थित होतील. योजनेला विलंब लावल्याने होणारा जादा खर्च राज्य किंवा केंद्र शासन देणार नाही. सर्व खर्च महापालिकेलाच करावा लागणार आहे. महासभेच्या फंदात न पडता तत्काळ महापौरांनी योजना मार्गी लावावी. या प्रश्नी हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक यांनी लक्ष घालावे, अशी सक्त सूचना पवार यांनी दिली. याबाबत जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचेशी चर्चा करून महासभा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. योजना अत्यंत पारदर्शकपणे राबवित असल्यानेच काहींनी यामध्ये खोट काढण्यास सुरुवात केली असावी.
अजित पवार : योजनेला फाटे फोडू नकाथेट पाईपलाईनसाठी विशेष सभेची गरज नाही
By admin | Updated: July 16, 2014 01:02 IST