गणपती कोळी - कुरुंदवाड -पर्ल्स कंपनीचे आर्थिक घोटाळे उघडकीस आल्याने गुंतवणूकदार, ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहक एजंटांचे उंबरे झिजवत असून, ग्राहकांच्या भीतीने अनेक एजंट गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या रडारवर पर्ल्स एजंट असून, त्यांना ग्राहकांकडून वसुलीबाबत अल्टीमेटम दिला जात आहे.अल्प कालावधीत दुप्पट परतावाच्या आमिषाला अशिक्षितांपासून उच्च शिक्षितही बळी पडले आहेत. एजंटांनाही भरघोस कमिशन देण्याच्या कंपनीच्या भूमिकेमुळे गुंतवणूक करणाऱ्या एजंटांची संख्याही वाढलीे. कंपनीचा एजंट होण्यासाठी ना शिक्षणाची अट, ना मार्केटिंग प्रमाणपत्राची. केवळ ग्राहकाला आकर्षित करून घेण्याची कला अवगत असणारा असल्यास छोट्या गावांपासून शहरांपर्यंत मोठ्या संख्येने एजंट झाले आहेत. एजंटांनी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, शेजारी यांनाच प्रथम ग्राहक बनविले आहे. ठेवी घेतानाही कंपनीचा आदर्शवत कामाचा पाढा गिरवत ‘तुमच्या पैशाला मी जबाबदार आहे,’ असा विश्वास दिल्याने अनेक ग्राहकही त्यांच्या विश्वासाला बळी पडले आहेत. एजंटांना मिळणारे भरघोस कमिशन यामुळे त्यांच्या राहणीमानात तर फरक पडलाच शिवाय अवघ्या सहा महिन्यांत ते एक वर्षात दोन चाकी, चार चाकी गाड्या घेऊन फिरू लागल्याने अल्पावधीत त्यांना मिळालेली श्रीमंती पाहून लोकही अचंबित झाले. मात्र, ग्राहकाला अल्पावधीत दुप्पट परतावा देण्याबरोबर एजंटांना मोठे कमिशन देणे कंपनीला कसे शक्य आहे, याचा गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाने कधीच विचार केला नाही. आता कंपनीच्या आर्थिक घोटाळ्यांतून हे गुपित स्पष्ट झाले असून, गुंतवणूकदार, ठेवीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. कंपनीचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने ग्राहक एजंटांकडे धाव घेऊन गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांचा जाब विचारीत आहेत. ग्राहकांचा रोष पाहून अनेक एजंट गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची पाचावर धारण बसली आहे. फसवणूक झालेले ग्राहक एकत्र येऊन एजंटाला कोणत्याही परिस्थितीत ठरावीक पैसे परत देण्याचा अल्टीमेटम देत आहेत. त्यामुळे एजंट मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत.
एजंटांना अल्टीमेटम
By admin | Updated: November 11, 2014 23:26 IST