लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमाफीच्या निकषांचा रोज एक अध्यादेश काढून देवेंद्र फडणवीस सरकार आकड्यांचा खेळ करत असून कर्जमाफीत सरकार नापास झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली पण त्या आडून राज्य सरकार अफझलखानाचा अजेंडा राबवत आल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्हा बँकेवर ढोल-ताशांचा गजर करत मोर्चा काढला. ‘शिवसेनेचा एकच नारा सात-बारा कोरा’, ‘सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे’ या घोषणा व ढोल-ताशांचा आवाजाने बँकेचा परिसर दणाणून गेला. यावेळी पवार यांनी भाजप सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले. रोज-रोजच्या निकष व घोषणांमुळे कर्जमाफी नको म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून मुख्यमंत्री आता रोज नवा ‘आकडा’ काढत असल्याची टीका करत संजय पवार म्हणाले, शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली पण त्या मागे अफजलखानाचा अजेंडा दडला आहे. रघुवीर जादुगाराला लाजवेल अशी ते जादू करत असून या जादूला शेतकरी आता भुलणार नाहीत. चंद्रकांतदादा तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, जरा कर्जमाफीवरून जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांतील गोंधळ बघावा, असे आवाहन करत जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, शेतकऱ्यांना वेठीस धराल तर सरकारची अब्रू चव्हाट्यावर आणू. किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला याचा माहिती फलक बँकेच्या प्रत्येक शाखेच्या दारात लावावा अन्यथा कुलूपे ठोकू. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मागण्यांचे निवेदन बँकेचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांना देण्यात आले. उद्यापासून बँकेच्या दारात यादी लावण्याचे शिंदे यांनी मान्य केले. उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, संग्राम कुपेकर, साताप्पा भवन, संभाजी भोकरे, मधुकर पाटील, रवी चौगुले, दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, हर्षल सुर्वे, राजू यादव, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, तानाजी आंग्रे, शुभांगी पावार, मंगल चव्हाण, रिया पाटील, दिप्ती कोळेकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या दारात लुटारूंचे ढोल!बँकेतील लुटारू राष्ट्रवादीच्या मंडळींनी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या दारात ढोल-ताशा वाजवून वसुली केली. आता आम्ही ढोल-ताशा वाजवत कर्जमाफीच्या यादीची मागणी करत असल्याची टीका संजय पवार यांनी केली.पवारांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलेमोर्चा जिल्हा बँकेच्या दारात आल्यानंतर महिलांसह कार्यकर्ते रणरणत्या उन्हात उभे होते; पण काही पदाधिकारी बी. टी. कॉलेज समोरील झाडाखाली उभे दिसल्याने संजय पवार चांगलेच संतापले. ऊन सहन होत नसेल तर घरी जावा, पदाधिकारी कशाला झालात, महिला उन्हात उभ्या आहेत आणि तुम्ही सावलीत कसे? अशा शब्दांत त्यांनी सुनावले. १९६ थकबाकीदारांत सातच पात्र शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील २५ संस्थांची माहिती घेतली. एका संस्थेचे १९६ थकबाकीदारांमध्ये केवळ सात शेतकरी कर्जमाफीच्या निकषांत बसत आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी ८० हजार शेतकऱ्यांचा आकडा काढला कुठून? फसवी आकडेवारी जाहीर करण्याचे बंद करा अन्यथा शेतकरीच तुम्हाला दणका देतील, असे पवार यांनी सांगितले.
सरकारकडून अफझलखानाचा अजेंडा
By admin | Updated: July 11, 2017 00:52 IST