कोल्हापूर : व्यसनापासून चार हात लांब राहणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्याच नावानेच तब्बल ८८ वर्षे विकल्या जाणाऱ्या बिडीचे अखेर साबळे बिडी असे नामकरण करण्यास संभाजी ब्रिगेडने भाग पाडले. कंपनीने बुधवारी तशी अधिकृत घोषणा करून नवीन पॅकेट बाजारात आणल्यानंतर संभाजी ब्रिगेडने विक्री न करणाऱ्या सात व्यापाऱ्यांचा राजमाता जिजाऊ चरित्रग्रंथ देऊन अनोखा सत्कार केला.
छत्रपती संभाजी महाराजांनी कधी काडीचेही व्यसन केले नाही, पण त्यांच्या फोटो व नावासह गेली ८८ वर्षे जगभरातील ३० देशात ही बिडी विकली जात आहे. संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना ही बाब खटकल्याने त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. यातूनच पाच महिन्यांपूर्वी कोल्हापुरात आंदोलनास सुरुवात झाली. बिडी तयार करणाऱ्या पुण्यातील साबळे कंपनीकडे तक्रार करून नाव बदलण्याची विनंती केली, पण त्यांनी दखल न घेतल्याने कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत माल आणलेला ट्रक अडवून धरला. कोल्हापूरसह इचलकरंजीतही अशीच माेहीम राबविली. पाच महिन्यांत सहा वेळा माल पकडून तो परत पाठविण्यात आला. अखेर कंपनीने नाव बदलत असल्याचे जाहीर केले.
व्यापाऱ्यांनी सहकार्य केल्यानेच हे आंदोलन यशस्वी झाले म्हणून त्या व्यापाऱ्यांचाच प्रामुख्याने सत्कार करण्यात आला. लक्ष्मीपुरीत प्रत्यक्ष जाऊन उमेश शेटे, अशोक काजवे, वसंतराव पवार, अविनाश कटगे, विशात भंडारी, बालराज हिंदुजा, शशिकांत कदम यांचा राजमाता जिजाऊ चरित्र ग्रंथ भेट देऊन कोल्हापुरी फेटा बांधून ऋण व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अभिजीत भोसले, शर्वरी माणगावे, डॉ. सागर गुरव, मदन परिट, नीलेश सुतार, संताजी घोरपडे, उमेश जाधव, अरुण जकाते, बाळासो पाटील, श्वेता माने, शाहबाज शेख उपस्थित होते.
फोटो: २१०१२०२१-कोल-संभाजी ब्रिगेड
फोटो ओळ: कोल्हापूरात संभाजी ब्रिगेडतर्फे गुरुवारी संभाजी बिडीची विक्री न करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.