कोल्हापूर : वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांनी आपले न्याय्य हक्क व पुनर्वसनासाठी गेल्या २०० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू ठेवलेले बेमुदत ठिय्या आंदोलन शुक्रवारी मागे घेतले. गुरूवारी रात्री डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत येत्या दोन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. तसेच त्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आखून दिला. त्यानुसार भूसंपादन झालेल्यांची यादी, लाभ मिळालेल्या नागरिकांची यादी तयार करून गाव चावडीवर प्रसिद्ध करणे, २१५ हेक्टर जमिनीच्या निर्वणीकरणाची अंतिम मंजुरी, शाहुवाडी, पन्हाळ्यातील मुलकीपड व शासकीय जमिनींची तसेच प्रलंबित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, पसंती झालेल्या ८३.१२ हेक्टर शेतीच्या प्रस्तावाला मंजुरी, वसाहतींना मुलभूत सोयीसुविधा अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले.
--
फोटो नं १७०९२०२१-कोल-श्रमिक
ओळ : श्रमिक मुक्तीदलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले.
--