कोल्हापूर : प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ या मागणीसाठी आज, शनिवारी वकिलांनी टायर पेटवून व पक्षकारांच्या नोटिसा जाळून टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आंदोलन केले; तसेच महालोक अदालतवर बहिष्कार टाकला. यावेळी येथे आलेल्या काही पक्षकारांनी तसेच शहरातील विविध पक्ष, संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी एका पक्षकाराची वकिलांबरोबर शाब्दिक चकमक झाली. त्यावरून वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी (पान ४ वर)पोलिसांनी २० वकिलांसह २७ जणांना अटक केली. कोल्हापूरसह सांगली, सातारा,रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ मागणीसाठी काल, शुक्रवारपासून वकिलांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करून न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. आज, शनिवारी राष्ट्रीय महालोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सुमारे दहा वाजल्यापासून पक्षकार जिल्हा न्यायालयासमोर येऊ लागले. त्यावेळी वकिलांनी त्यांना खंडपीठाच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्यानुसार पक्षकारांनी वकिलांच्या विनंतीला मान देऊन महालोक अदालतच्या आलेल्या नोटिसा त्यांच्याकडे देऊन पाठिंबा दिला. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनस्थळी आले. याठिकाणी कोणत्याही स्थितीत खंडपीठ झालेच पाहिजे, अशा घोषणा देत सर्वजण सीपीआर हॉस्पिटल चौक (चिमासाहेब महाराज चौक) येथे आले. सर्वांनी मानवी साखळी करून सुमारे दहा ते १५ मिनिटे ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.त्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक पुन्हा जिल्हा न्यायालयाजवळ आले. त्यावेळी पक्षकार हरी नारायण कुलकर्णी (रा. हिरवडे खालसा, ता.करवीर) हे महालोक अदालतसाठी आले. त्यावेळी वकिलांनी त्यांना अडविले. यावरून वकील व त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली.‘मी लोकन्यायालयासाठी जाणारच’ असा आक्रमक पवित्रा कुलकर्णी यांनी घेतला. त्यावरून काही वकील व आंदोलकांनी त्यांना धक्काबुकी केली. हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी त्यांच्या तावडीतून कुलकर्णी यांची सुटका केली. याच सुमारास आंदोलकांनी रस्त्यावर टायर व नोटिसा पेटवून संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे, उपाध्यक्ष अॅड. के. व्ही. पाटील, अॅड. राजेंद्र मंडलिक यांच्यासह २० वकील व सात सामाजिक कार्यकर्त्यांना अशा २७ जणांना ताब्यात घेतले. सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. पोलीस ठाण्याच्या येथून सर्वजण दसरा चौक,सीपीआरचौक मार्गे ‘वुई वॉन्ट खंडपीठ’अशा घोषणा देत आंदोलनस्थळी आले. यानंतर सायंकाळपर्यंत याच ठिकाणी थांबून होते.अटक केलेल्या वकिलांची नावे : विवेक घाटगे, राजेंद्र मंडलिक, के. व्ही. पाटील, माजी अध्यक्ष अजित मोहिते, प्रकाश मोरे, राजेंद्र किंकर, सुशांत गुडाळकर, समीर पाटील, सतीश खोतलांडे, तेहझीज नदाफ, आनंदराव जाधव, दीपक पिंपळे, पंडित सडोलीकर, योगेश साळोखे, मयांक बोरसे, सतीश कुणकेकर, विनोद सूर्यवंशी, नंदकुमार पा. पाटील, सागर पिसाळ, विजय महाजन यांच्यासह प्रसाद जाधव, जयदीप शेळके, सुरेश दिनकर गायकवाड. दरम्यान, या सर्वांवर लक्ष्पीपुरी पोलिसांकडून मुंबई पोलीस कायदा ६८-अ नुसार कारवाई करण्यात आली.यांनी दिला पाठिंबा...टोल समिती, पक्षकार जिल्हा महासंघ, यादवनगरमधील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, कोल्हापूर जिल्हा धान्य व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनोद डुणूंग, मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य मंगेश मंगेशकर, ‘एआयबीएसएनएल’चे महाराष्ट्र अध्यक्ष व सीएओ के. ए. मोहिरे, बीएसएनएल लेबर अॅँड कॉन्ट्रॅक्टर लेबर असोसिएशन यांच्यासह विविध पक्ष, संघटनांमधील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.
वकिलांचे आंदोलन टायरी पेटवून
By admin | Updated: December 14, 2014 00:56 IST