कोल्हापूर : महाविद्यालयीन प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १६ जूनपासून होणार आहे. शहरातील ३२ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाचे वर्ग रविवार (दि. १२) पासून सुरू होतील. या प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले.कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेगळी आहे. यात शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमांची ३२ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३५०० आहे. दहावीच्या टक्केवारीवर प्रवेशाची सूत्रे निश्चित केली असल्याने समितीकडून वाढीव प्रवेश क्षमतेचे नियोजन करण्यात येईल. ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. प्रवेश प्रक्रियेबाबत लिपिक, शिक्षक आणि अर्ज वितरण-संकलन केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे उद्बोधन वर्ग रविवार (दि. १२) ते मंगळवारपर्यंत (दि. १४) घेण्यात येणार आहेत. अकरावीचे वर्ग ११ जुलैपासून सुरू होणार असल्याचे गोंधळी यांनी सांगितले. दरम्यान, यावर्षी शहरातील विविध शाळांमधील नियमित व पुनर्परीक्षार्थी असे एकूण ७९४९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शहरालगतच्या काही तालुक्यांतूनही विद्यार्थी शहरातील महाविद्यालयांत अकरावीसाठी प्रवेशित होतात. त्यांचे प्रमाण आणि अकरावी प्रवेशाची सध्याची क्षमता लक्षात घेता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फारसा ताण घेण्याची गरज नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)निवड यादीनंतर ‘अॅप’वर माहितीयावर्षी पहिल्यांदाच शहरातील महाविद्यालयांची यादी, अनुदानित-विनाअनुदानित महाविद्यालये, तेथील प्रवेश क्षमता, वसतिगृहांची सुविधा, आदी स्वरूपांतील माहिती मोबाईल अॅपवर दिली जाणार आहे. प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्यांने माहिती देण्यात येणार असल्याचे माहिती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. व्ही. बी. हेळवी यांनी दिली.
प्रवेश अर्ज १६ जूनपासून मिळणार
By admin | Updated: June 9, 2016 01:23 IST