कोल्हापूर : अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन केले जाईल शिवाय यापुढे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात येणार नाही, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज, सोमवारी दिले.मंत्रालयात महाराष्ट्र राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघासमवेतच्या बैठकीत त्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी शिक्षण संचालक सुनील मगर, शिक्षक आमदार रामनाथ मोते प्रमुख उपस्थित होते.तावडे म्हणाले, समायोजन हे केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात येणार नाही. पदावन्नत झालेल्या मुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीस संरक्षण देण्यात येईल. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासक प्रगती योजना लागू केली जाईल. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी पाच वर्षे अकरा महिने पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश या नियमांचा फेरविचार करून निर्णय घेण्यात येईल. बालवाडी सेविकांना वेतन, विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करु, तसेच ६० टक्के अनुदानित शाळांना वेतन अनुदानासह सन २०१४-१५ नवीन संचमान्यता आरटीई निकषांनुसार नवीन शिक्षकांच्या जादा पदांसह त्वरित देऊ. बैठकीस माजी आमदार संजिवनी रायकर भगवानराव साळुंखे, महासंघाचे कोल्हापूर शहराध्यक्ष संतोष आयरे, राज्य शिक्षकेतर प्रमुख एम. डी. पाटील आदी उपस्थित होते.
अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार नाही : विनोद तावडे
By admin | Updated: November 25, 2014 00:38 IST