बाजार गेट प्रभाग सर्वसाधारण झाल्याने येथे आजी-माजी नगरसेवक आमने-सामने येणार आहेत. यामध्ये उमा बनछोडे, निशिकांत मेथे, विजय सरदार, अभिजित गजगेश्वर, विश्वनाथ सांगावकर किंवा अभिजित सांगावकर यांच्यासह ऋतुराज क्षीरसागर, ईश्वर परमार यांच्या नावांचीही चर्चा आहे. मातब्बर उमेदवार रिंगणात असल्यामुळे शहरातील सर्वात चुरशीची निवडणूक येथे होणार आहे.
सदरबाजारमध्ये पुन्हा लाटकर, माने यांच्यात लढत
सदरबाजार प्रभाग सर्वसाधारण झाला असून राजू लाटकर आणि मारुती माने हे पारंपरिक विरोधक आमने-सामने येणार आहेत. राजेश लाटकर आणि विद्यमान नगरसेविका स्मिता माने यांच्यात लढत होणार आहे. मागील निवडणुकीत येथे टोकाची ईर्षा पाहण्यास मिळाली होती. या निवडणुकीतही अशीच स्थिती राहील, असेच वातावरण आहे.
मगदूम, सावंत पुन्हा आमने-सामने
संभाजीनगर बसस्थानक प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला आहे. येथील विद्यमान नगरसेवक महेश सावंत यांनी लगतचा सर्वसाधारण झालेला राजलक्ष्मीनगर प्रभागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रभागातील विद्यमान नगरसेविका दीपा मगदूम यांचे चिरंजीव दिग्विजय मगदूम यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
कदमवाडीत नाना विरुध्द कोण...
भोसलेवाडी कदमवाडी प्रभाग आरक्षित झाल्याने गटनेता सत्यजित कदम यांनी लगतच्या कदमवाडी प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दीपक शेळके यांचे त्यांच्यासमोर आव्हान असेल, अशी चिन्हे आहेत.
बातमीदार : विनोद