जहाॅँगीर शेख
कागल : गेल्या काही वर्षांत देशात चर्चेत आलेल्या उद्योजक गौतम अदानी समूहाचे आगमन कागलमध्ये झाले आहे. या समूहाने राज्यातील २८ सीमा तपासणी नाके चालविण्यासाठी घेतले असून, त्यामध्ये कागलमधील ५२ एकरात उभारलेल्या चेकपोस्ट नाक्याचाही समावेश आहे. राज्यात असे भव्य तपासणी नाके उभारून ते चालविण्याचा करार केलेल्या सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीचे पन्नास टक्के शेअर्स अदानी समूहाने घेतले आहेत. त्यामुळे हा बदल झाला असून, आता हा नाका दिवाळीपूर्वी सुरू होईल, असे बोलले जात आहे.
महाराष्ट्राला लागून असलेल्या सहा राज्यांच्या सीमेवर असलेली २८ आरटीओ चेकपोस्ट नाकी खाजगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने घेतला होता. त्यानुसार सद्भाव कंपनीशी करार होऊन हे नाके उभारले गेले. एकाच ठिकाणी वाहन व व्यापाराशी संबंधित सर्व करांची वसुली आरटीओ कार्यालयाच्या देखरेखेखाली ही खाजगी कंपनी करणार होती. ऑनलाइन पद्धतीने वाहन तपासणी, वजन तपासणी, माल तपासणी, कागदपत्रे तपासणीची यंत्रणा या नाक्यावर उभारली आहे. सध्या गुजरात सीमेजवळ तसेच वर्धा जिल्ह्यात अशा पद्धतीने तपासणी नाके सुरू आहेत. कागल शहरालगत उभारलेला हा नाका तीन वर्षांपूर्वीच बांधून तयार आहे. उद्घाटनाची तारीख निश्चित झाली होती; पण महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर ही प्रक्रिया थांबली आहे. आता सद्भावऐवजी अदानी समूहाकडे हा नाका चालविण्यास गेल्याने दीपावलीपूर्वी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात आदानी समूहाचे आगमन झाले आहे.
(चौकटीत)
हजारो कोटींची गुंतवणूक...
कागल येथे कर्नाटक राज्य सीमेजवळ महामार्गाच्या दोन्ही बाजूंना हा नाका आहे. बावन्न एकरात पसरलेल्या या नाक्यावर दोन गोडाऊन, कार्यालयीन इमारती, अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी सुसज्ज निवासव्यवस्था, एकाच वेळी नाक्यावरून लहान- मोठी दहा वाहने जाण्याची व्यवस्था आहे. व्यापारी संकुलही आहे. महामार्गावर जाणारे प्रत्येक वाहन या तपासणी यंत्रणेतूनच पुढे जाईल, अशी रचना आहे. हजारो कोटींची गुंतवणूकपूर्वी सद्भाव कंपनीने केली आहे, तर आता अदानी समूहाने ही गुंतवणूक केली आहे.
फोटो.
कागल येथे उभारण्यात आलेल्या चेक पोस्ट नाक्यावरील वाहन तपासणी यंत्रणा अशा पद्धतीची आहे.
१९ कागल चेकपोस्ट