सांगली : इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे झालेल्या होड्यांच्या शर्यतीच्या वादातून मिरज तालुक्यातील कवठेपिरान व समडोळीतील ग्रामस्थांमध्ये काल, शनिवारी रात्री हाणामारी झाली. दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी एकमेकांना लक्ष्य करून दिसेल त्याला बदडून काढले. तीन दुचाकीही पेटविल्या. तरीही दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.काल, शनिवार इचलकरंजीत होड्यांच्या शर्यती झाल्या. यामध्ये कवठेपिरान व समडोळी येथील बोट क्लबनी सहभाग घेतला होता. शर्यतीवेळी या दोन्ही क्लबमध्ये काट्याची टक्कर झाली होती. एकमेकांच्या होड्यांनाही त्यांनी टक्कर दिली होती. शर्यत झाल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. (पान १० वर)तीन दुचाकी जप्त समडोळी फाटा व कवठेपिरान येथे पेटविलेल्या तीन दुचाकी पोलिसांनी पंचनामा करून जप्त केल्या आहेत. या दुचाकींचे मालक निष्पन्न झाले आहेत, मात्र त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यास नकार दिला आहे. समडोळी फाट्यावर पेटविलेल्या दुचाकीच्या मालकाने, दोन लोकांनी माझी दुचाकी पेटविली असून, अंधार असल्याने मी त्यांना ओळखू शकलो नाही, असे सांगितले आहे. त्याला तक्रार देण्यास सांगितले, तथापि तोही तयार झाला नाही. त्यामुळे आता पोलीस स्वत: गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी सांगितले.दोन्ही गावांत बैठकनिरीक्षक जाधव यांनी समडोळीत रविवारी दुपारी बैठक घेतली. जाधव यांनी ग्रामस्थांना तक्रार द्या, गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर सायंकाळी कवठेपिरानमध्येही बैठकीचे आयोजन केले होते. परंतु ग्रामस्थ या बैठकीला आले नाहीत.
कवठेपिरान-समडोळी ग्रामस्थांमध्ये हाणामारी
By admin | Updated: August 11, 2014 00:47 IST