कोल्हापूर : सीपीआर अर्थात कोल्हापूरसह कोकणातील सर्वसामान्यांचा ‘थोरला दवाखाना’ वाचविण्यासाठी सीपीआर बचाव कृतीस समितीने कंबर कसली असून त्याचा धसका प्रशासनाने घेतला आहे. नांदेड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचा ‘रोल मॉडेल’ म्हणून वापर करण्यासाठी नकाशे आणण्यासाठी स्वत: अधिष्ठाता नांदेडला रवाना झाले आहेत. सोमवारी सीपीआर बचाव कृती समितीच्यावतीने सीपीआर हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांना जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय समितीने अक्षरश: प्रश्नांचा भडिमार केला. समितीच्यावतीने वीस प्रमुख मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता डॉ. कोठुळे यांना देण्यात आले. त्यातील प्रमुख मागण्यांचा विचार तत्काळ करत त्यांनी हॉस्पिटलमधून रुग्णांना बाहेरील औषधे आणण्यासाठी चिठ्ठ्या देऊ नयेत, असे सक्त सूचना केली आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर येथील वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णांना बाहेरील औषधे लिहून दिली नाहीत तसेच जिल्हा रुग्णालयाला स्वतंत्र पूर्वीचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी स्वत: डॉ. कोठुळे तयारीला लागले आहेत. नांदेड येथे नव्याने सुरू झालेल्या जिल्हा रुग्णालयाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून कोल्हापुरात शेंडा पार्क येथे नवीन पाचशे खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून यापूर्वी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, हा निधी मिरज येथील शासकीय रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आहे. सध्या नव्याने राज्य शासनाकड नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
‘सीपीआर’ची यंत्रणा लागली कामाला कृती समितीचा धसका : नांदेड रुग्णालयाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून पाहणीसाठी गेले स्वत: अधिष्ठाता
By admin | Updated: May 9, 2014 00:26 IST