कणकवली : जनशताब्दी एक्स्प्रेसला झालेला अपघात जेसीबी चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. या अपघातात कोकण रेल्वेची कोणतीही चूक नसून, रेल्वेसेवा सुरक्षितच असल्याचा दावा व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल यांनी केला आहे.बोर्डवे-कसवण येथे अपघात झाल्यानंतर काल, रविवारी रात्री अपघातातील जखमींची तायल यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच घटनास्थळीही भेट दिली. आज, सोमवारी त्यांनी कणकवली रेल्वे स्थानकात पत्रकारांशी संवाद साधला. भानुप्रसाद तायल म्हणाले, कसवण येथील अपघात जेसीबी चालकाच्या चुकीमुळे झाला आहे. ट्रेलरमधून जेसीबी घेऊन जाणे आवश्यक आहे. मात्र, तसे झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या अपघाताबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल. कोकण रेल्वेची सेवा सुरक्षित असून, विनाकारण कोणीही बदनामी करू नये. कणकवली रेल्वे स्थानकातील २३२२४३ हा दूरध्वनी क्रमांक अंतर्गत प्रशासकीय बाबींसाठी आहे. प्रवाशांसाठी १३९ हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर चौकशी अथवा आपली तक्रार नोंदविता येईल. कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक रेल्वेच्या सुविधांबाबत प्रवाशांना अथवा इतर व्यक्तींना अधिकृतरीत्या माहिती देतील, असेही तायल यांनी सांगितले.भानुप्रसाद तायल म्हणाले, अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने औषधोपचाराची व्यवस्था केली होती. जखमी प्रवाशांना भेटण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीयांना मोफत रेल्वे पास देण्यात येत असून, नातेवाइकांची निवासाची व्यवस्था रेल्वेच्यावतीने हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. अपघात झालेल्या जनशताब्दीच्या प्रवाशांना मोफत चहा, पाणी पुरविण्यात आले. रद्द तिकिटांचा परतावा देण्यात आला. तसेच कोकणकन्या, राज्यराणी या गाड्यांतून प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचविण्यात आले. ज्या प्रवाशांना गंतव्य स्थानी पोहोचण्यास रात्री उशीर झाला, त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे तायल यांनी सांगितले. (वार्ताहर)डबल ट्रॅकसाठी १५ हजार कोटींची गरजकोकण रेल्वेमार्गावर डबल ट्रॅक टाकण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव विचाराधीन असून, त्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचेही तायल यांनी सांगितले. ग्रामपंचायतींना पत्र देणारकोकण रेल्वेमार्गावरील अनेक ओव्हरब्रीजना रेलिंग नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वेकडे कोणत्याही ग्रामपंचायतीने केलेली नाही. तरीही ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतून रेल्वेमार्ग जातो, त्यांनी त्यांच्या अडचणी रेल्वे प्रशासनाला कळवाव्यात, असेही एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान तायल यांनी सांगितले. चालकावर गुन्हाजेसीबी चालक दौलसाब नबीसाब बागवान (वय २३, रा. कलाकेरी, सिंदगी, विजापूर) याच्यावर निष्काळजीपणे जेसीबी चालवून रेल्वेच्या डब्यांचे नुकसान करणे व रेल्वे प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय रेल्वे अॅक्ट १५३, भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जखमींची प्रकृती स्थिर या अपघातातील गंभीर जखमी तीन प्रवाशांना प्रत्येकी २५ हजार व किरकोळ जखमी १३ प्रवाशांना प्रत्येकी पाच हजार रुपये भरपाई दिल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अपघातातील गंभीर जखमींची प्रकृती स्थिर आहे. किरकोळ जखमींना उपचार करून सोडण्यात आले.08122014-‘ंल्ल‘-01कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल.
जेसीबी चालकाच्या चुकीनेच अपघात
By admin | Updated: December 9, 2014 01:24 IST