इचलकरंजी : पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली ‘आक्रोश पूरग्रस्तांचा परिक्रमा पंचगंगेची’ ही पदयात्रा आज (शनिवारी) इचलकरंजीत येणार आहे. येथील तीन बत्ती चौकात पदयात्रेचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी अनोख्या पद्धतीने ‘स्वाभिमानी’चे समर्थक व पूरग्रस्त नागरिक तयारीला लागले आहेत.
पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शेट्टी यांनी १ सप्टेंबरपासून प्रयाग चिखली येथून पदयात्रेच्या माध्यमातून रान उठवले आहे. त्यांना या पदयात्रेच्या मार्गावरील गावांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी सकाळी पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथून सुरू होणारी पदयात्रा इंगळी, रुई, चंदूरमार्गे इचलकरंजीत येणार आहे. तेथून पूरबाधित भागातून नदीवेस नाकामार्गे शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे मुक्कामी जाणार आहेत. या यात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या संतप्त भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.