कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ९९६ कोरोना रुग्ण आढळले असून, ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही जिल्ह्यातील मृतांची संख्या कमी होत नसून, याबाबत प्रशासन चिंतेत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ३०० च्या वर गेली आहे. दिवसभरामध्ये १४ हजार नागरिकांना लसीचे पहिले आणि दुसरे डोस देण्यात आले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे संजय घोडावत विद्यापीठात कोरोना काळजी केंद्र सुरू करण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. याेगेश साळे यांनी शनिवारी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.