गडहिंग्लज तालुक्यात खरीप हंगामात १६ हजार हेक्टर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. बियाण्यांचा तुटवडा आणि उगवण क्षमता लक्षात घेऊन तालुक्यातील ५६६ शेतकऱ्यांकडे ८,९७० क्विंटल बियाणे राखीव ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी विभागातर्फे देण्यात आली.
खरीपातील पेरणीपूर्व बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडील साठ्यांची तपासणी केली आहे. ९४ दुकानदारांची तपासणी केली असून साठ्याबाबत कांही दुकानदारांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.
तालुक्यात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाची अशाप्रकारे अनुकूलता राहिल्यास वेळेत पेरण्या पूर्ण होतील.
गेल्यावर्षी निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही कंपन्यांच्या बियाण्यांवर बंदीही घालण्यात आली. निकृष्ट बियाण्यांमुळे त्याची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.