कोल्हापूर : सेट टॉप बॉक्स न बसविलेल्या केबल कनेक्शनधारकांचे शुक्रवार (१ जानेवारी)पासून प्रक्षेपण बंद झाले आहे. रात्री बारानंतर अचानक हे प्रक्षेपण बंद झाल्याने केबल कनेक्शनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. शुक्रवारी सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर प्रक्षेपण पूर्ववत सुरू झाले. जिल्ह्यातील नागरी भागातील सुमारे ७५ हजार केबल कनेक्शनधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविले आहेत.पहिल्या टप्प्यात नागरी भागात सेट टॉप बसविण्याचे काम सुरू आहे. केबलचालकांनी दिलेल्या यादीनुसार जिल्ह्यातील नागरी भागात एकूण ६३ हजार ८४४ केबल कनेक्शनधारक आहेत. त्यापैकी सुमारे ३५ हजार कनेक्शनधारकांनी २८ डिसेंबरपर्यंत ही यंत्रणा बसविली. हे काम ५५ टक्के झाले होते. ३१ डिसेंबरपर्यंत हे सेट टॉप बसवून घेण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. ३१) दुपारपर्यंत सुमारे ७४ हजार केबलधारकांनी सेट टॉप बॉक्स बसवून घेतले. यामध्ये शुक्रवारी एक हजाराची भर पडली असून, सुमारे ७५ हजार कनेक्शनधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविले. आता जिल्हा करमणूक कर विभागाने एक लाख सेट टॉप बॉक्स बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या केबलचालकांकडून अॅनालॉक सिस्टीम सुरू आहे; परंतु शुक्रवार रात्री बारापासून ती बंद होऊन डिजिटल अॅक्सेसिबल केबल टीव्ही सिस्टीम कार्यान्वित झाल्याने ज्यांनी सेट टॉप बॉक्स बसविला नाही त्यांचे प्रक्षेपण आपोआप बंद पडले. त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. शुक्रवारी सेट टॉप बॉक्स बसविण्याची धावपळ संबंधितांकडून सुरू होती. केबलचालकांकडून सुमारे १४५० रुपयांना हे बॉक्स बसविण्यात येत आहेत. मात्र, डिश टीव्हीधारकांसाठी सेट टॉप बॉक्स बसविण्याची आवश्यकता नाही. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील नागरी भागात सेट टॉप बॉक्स बसविण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत शंभर टक्क्यांच्या पुढे काम झाले आहे. ज्यांनी सेट टॉप बॉक्स बसविले नाहीत त्यांचे प्रक्षेपण आपोआप बंद होत आहे. तसेच केबलचालकांकडून अॅनालॉक सिस्टीम सुरू ठेवली जात आहे का, याचीही तपासणी येत्या काळात केली जाणार आहे.-कल्पना ढवळे, जिल्हा करमणूक कर अधिकारी,कोल्हापूर महासंघ,
कोल्हापुरात ७५ हजार जणांनी बसविले सेट टॉप बॉक्स
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST