कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील श्री यशवंत सहकारी बँकेसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत चुरशीने पण शांततेत ७१.३७ टक्के मतदान झाले. २१ जागांसाठी ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दुरंगी झालेल्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी ‘यशवंत पॅनेल’ला शह देण्यासाठी ‘संस्थापक यशवंत पॅनेल’ने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे निकालाबाबत कुंभी-कासारी पंचक्रोशीत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, सोमवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निकाल दोन वाजेपर्यंत हाती देणार असल्याची माहिती करवीरचे उपनिबंधक सुनील धायगुडे यांनी दिली.गेले १५ दिवस कुंभी-कासारीचा परिसर यशवंत बँकेच्या निवडणुकीने ढवळून निघाला होता. सत्ताधारी गटाने सावध भूमिका घेत आपल्या कामाचा अहवाल मांडण्याचा प्रयत्न केला. विरोधी संस्थापक पॅनेलचे सत्ताधारी गटाच्या कारभारावर बोट ठेवून आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडल्या.रविवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी कुंभी- कासारी, बीड, कळे व पोर्ले तर्फ ठाणे येथील मतदार केंद्रांपर्यंत आणण्यासाठी दोन्ही गटांकडून गाड्यांची व्यवस्था केली होती. कुंभी-कासारी येथील केंद्रावर संस्थापक पॅनेलचे प्रमुख एकनाथ पाटील, शंकरराव पाटील (शिंगणापूरकर) यांनी मतदान केले, सत्तारूढ पॅनेलचे प्रमुख प्रकाश देसाई यांनी कळे मतदान केंद्रावर मतदान केले.मतदार यादी त्रृटी आढळल्याने कुडित्रे केंद्रावर वादावादी झाली. येथे कोपार्डे येथील मतदार विजय बापू पाटील यांच्या नावाचे बोगस मतदान झाले, तर शारदा तुकाराम पाटील ऐवजी शरद तुकाराम पाटील असे मतदान यादीत नाव आल्याने मतदान करण्यास पोलिंग एजंटने विरोध केला. मात्र, निवडणूक अधिकारी सुनील धायगुडे यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून शारदा पाटील यांना मतदान करण्यास परवानगी दिली. सकाळी १२ वाजेपर्यंत चुरशीने ३२.३४ टक्के, तर दुपारी ४ पर्यंत ६६ टक्के मतदानाची आकडेवारी पोहोचविली होती. एकूण १४ हजार २२१ मतदानांपैकी १0 हजार १४९ मतदारांनी मतदान केले. (वार्ताहर)
‘यशवंत’साठी ७१ टक्के मतदान
By admin | Updated: January 16, 2017 00:50 IST