दत्तात्रय पाटील -म्हाकवे --वाढत्या महागाईने रोजच्या मीठ-भाकरीची जुळवाजुळव करताना दमछाक होणाऱ्या आणि हाता-तोंडाशी गाठभेट होणे मुश्किल झालेल्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याचा अपघाता मृत्यू झाल्यास अशा कुटुंबावर आकाशच कोसळते. मात्र, या आर्थिक संकटरुपी आकाशाला ढिगळ लावण्याच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केली.गेल्या सहा वर्षांत अपघाती मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ८७४ शेतकऱ्यांपैकी तब्बल ६७३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना शेतकरी कुटुंबियांसाठी वरदान ठरणारी असून यामुळे जिल्ह्याला ६ कोटी ७३ लाखांचा निधी मिळाला आहे.जगाचा पोशिंदा असणारा आणि ‘ओ’ रक्तगट प्रमाणे कार्य करणाऱ्या बळीराजाला कठीण प्रसंगाला स्वत:च तोंड द्यावे लागते. एखादं संकट वादळ बनून आलंच तर अशावेळी त्याला कोणीही मदतीचा हात देत नाही, किंबहूना शासकीय धोरणातही त्याच्या मदतीची फारशी तजबीज नव्हती. यामुळे कुटुंबाची वाहताहती होऊ शकते, भारनियमनामुळे रात्री अपरात्री शेतीला पाणी देताना साप-विंचवाच्या दंशाने मृत्यू झाल्यास किंवा शेतात वैरण काढताना, झाडांच्या फांद्या तोडताना किंवा शेतीची अन्य कामे करताना हात, पाय, डोळा अथवा अन्य अवयवाला इजा झाल्यास त्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर येते. किंबहूना यामुळे कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजना अंमलात आणली.विमा कंपनीकडे आर्थिक मदतीसाठी मृत शेतकऱ्यांचा प्रस्ताव सादर केला जातो. त्याप्रमाणे गत वर्षांत विविध कारणाणी अपघाती मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ८७४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविले होते. मात्र, काही अपुऱ्या कागदपत्रामुळे जवळपास १७३ शेतकरी कुटुंबियांना विमा भरपाई मिळालेली नाही. तर ६७६ शेतऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश घरपोहच देण्यात आला आहे. यामुळे ६ कोटी ७३ लाखांचा निधी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांना मिळाला असून ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदायी ठरली आहे.
६७३ शेतकरी कुटुंबाना विमा योजनेचा ‘हात’भार
By admin | Updated: August 24, 2014 22:36 IST