शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील-टाकवडेकर होते.
प्रारंभी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी स्वागत करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी सूचित केल्याप्रमाणे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संजय गांधी योजना समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत एकूण १०६९ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ५८४ अर्ज मंजूर करण्यात आले, तर ३३८ अर्जामध्ये त्रुटी व १२५ अर्ज अपात्र करण्यात आले. त्रुटी आढळलेले अर्ज तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडून पाठवून पंधरा दिवसांत त्रुटी पूर्ण करून घेऊन पुढील बैठकीत अर्ज ठेवण्यात येतील, असे तहसीलदार डॉ. मोरे यांनी सांगितले.
बैठकीस सुजाता पाटील, महादेव कोळी, धन्यकुमार सिद्धनाळे, केशव राऊत, महादेव कोळी, आण्णासो बिलोरे, भालचंद्र लंगरे, विजितसिंह शिंदे, अफसर पटेल यांच्यासह महसूलचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.