शेवटच्या धरणग्रस्ताच्या पुनर्वसनाशिवाय स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ
आंबेओहोळ प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन कार्यक्रम
आजरा / उत्तूर :
प्रकल्पग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन करून कोल्हापूर जिल्ह्यातील पाच धरणांत ५.७६ टीएमसी पाणीसाठा येत्या दोन वर्षांत करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. आंबेओहोळ धरणग्रस्तांचा २० ते २२ वर्षांचा संघर्ष व त्यागातून धरणात पाणीसाठा झाला आहे. शेवटच्या धरणग्रस्ताच्या योग्य पुनर्वसनाशिवाय स्वस्त बसणार नाही, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. आजरा तालुक्यातील आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पाटबंधारेचे अधिकारी आणि ठेकेदार संजय पाटील यांचा मंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धरण झाले पाहिजे व त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला पाहिजे, असे धोरण शाहू महाराजांचे होते. त्याच धर्तीवर जिल्ह्यात रत्नाप्पाण्णा कुंभार, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी धरणांसाठी पाठपुरावा केला. युती शासनाच्या कालावधीत सुरू झालेला व शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना पूर्तता झालेला आंबेओहोळ हा प्रकल्प आहे, असे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.
राज्यात सात वर्षांनी पाणी अडविलेला आंबेओहोळ हा एकमेव प्रकल्प आहे. त्यामुळे उत्तूर भागातील महिलांच्या डोक्यावरील घागर यापुढे उतरणार असून प्रत्येक जमिनीला पाणी मिळणार आहे. जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांना मंत्री पाटील यांनी निधी देऊन ते तातडीने पूर्ण करावेत. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल, असेही आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागणवाडी व सोनुर्लेत २०२२ मध्ये, सर्फनाला व उचंगीत २०२३, तर धामणी प्रकल्पात २०२४ मध्ये पाणी अडविण्यात येणार आहे. पुनर्वसनातील अडथळे गृहीत धरून प्रकल्पग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन केले जाणार आहे, असेही मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, नाविद मुश्रीफ, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, संजय घाटगे, भय्या माने, युवराज पाटील, जि.प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी, आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, जलसंपदाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले. कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी आभार मानले.
..
पाणी परवाने देणार -मंत्री पाटील
धरणातील पाण्यावर जमीन सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी परवानासाठी अर्ज करावेत. त्याचे पाणी परवाने निश्चित दिले जातील. वेळेत पाणी परवाने दाखल झाली नाहीत तर कर्नाटकला पाणी जाईल, याची खबरदारी घ्या, असेही आमदार पाटील यांनी सांगितले
.
मेघोलीकरांचे योग्य पुनर्वसन करणार
भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे केले आहेत. सरकार मेघोलीकरांच्या पाठीशी आहे. त्यांचे निश्चित पुनर्वसन करणार आहे. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांनीही पाठपुरावा केल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
.