इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गेले चार दिवस डिजिटल फलक निर्मूलन करण्याच्या मोहिमेमध्ये सुमारे २०० मोठे फलक व ३५० लहान फलक काढून टाकले. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांसह त्यावरील चौकांनी मोकळा श्वास घेतला. फलक हटविण्याची मोहीम पालिकेने तीन स्वतंत्र पथकांमार्फत दोन पाळ्यांमध्ये राबविली. अवघ्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणावर फलक हटविण्याची कारवाई पालिकेकडून प्रथमच करण्यात आली. गुरुवार, ३० जूनपासून या मोहिमेला सुरुवात केली होती. जुन्या नगरपालिकेपासून जनता चौक, शिवाजी पुतळा चौक, शाहू पुतळा चौक ते करवीर नाका, तसेच संभाजी चौक ते आंबेडकर पुतळा मार्गे स्टेशन रोडवरील कमान अशी व्यापक मोहीम चालविण्यात आली. यामध्ये दोन डंपर, दोन क्रेन आणि तीन गॅसकटरसह पालिकेचे अधिकारी व ६० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मुख्य रस्त्यावरील लोखंडी खांब गॅसकटरच्या साहाय्याने कापून ते हटविले. त्याचबरोबर संभाजी चौक ते स्टेशन रोड आणि शाहू पुतळा ते करवीर नाका अशा रस्त्यांमधील दुभाजकांवरील ३५० लहान फलकसुद्धा कापून ते जप्त केले. धोकादायक कमान अखेर उतरविली करवीर नाका येथे नगरपालिकेची हद्द जेथून चालू होते, त्या ठिकाणी रस्त्यावर लोखंडी स्वागत कमान उभारण्यात आली होती. सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची ही कमान असल्यामुळे त्याचे लोखंडी पाईप, अॅँगल व पत्रे गंजल्यामुळे ते धोकादायक झाले होते. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही कमान हटविण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. त्याप्रमाणे शनिवारी मध्यरात्रीनंतर क्रेनच्या साहाय्याने ही कमान उतरविण्यात आली.
इचलकरंजीतील ५५० डिजिटल फलक हटविले
By admin | Updated: July 4, 2016 00:32 IST