लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात दरवर्षी गुन्हेगारीचा आलेख वाढत असतानाही गुन्हेगार पोलिसांना सापडेनात. न्यायालयाने फरार घोषित केलेले आणि पोलिसांना हवे असे सुमारे ५१० गुन्हेगार ‘मोस्ट वाँटेड’ आहेत. त्यांना शोधासाठी पोलीस मागावर आहेत. वर्षभरात ४० गुन्हेगार फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची कठोर शोध मोहीम सुरू आहे.
गुंडांच्या टोळ्यांना मिळणारा राजकीय अश्रय हा कारवाईला मारक ठरत आहे. गंभीर गुन्हेगारीत वाढच होत आहे. दहा वर्षांत सुमारे ५१० जण ‘मोस्ट वाँटेड’ झालेत. न्यायालयाने घोषित फरार व पोलिसांना हवे असलेल्यांचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे ८७ गुन्हेगारांना गजाआड केले आहे.
वर्षभर कोरोना परिस्थितीमुळे गुन्हेगारीचा टक्का घसरला. पोलीस खात्यानेही गुंडांच्या कारवायावर वचक ठेवल्याचे दिसते. तरीही वर्षभरात ४० जण ‘मोस्ट वाँटेड’ आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस जिवाचे रान करत आहेत. २०१९ मध्ये एकूण ४५९८ गुन्हे दाखल झाले तर २०१९ मध्ये कोरोनाचा कहर असतानाही एकूण ४३४७ गुन्हे पोलीस रेकॉर्डवर दाखल झाले.
वर्षभरात २६ गुन्हेगार हद्दपार
वर्षभरात विविध गुन्ह्यांतील सुमारे २६ जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले. त्यापैकी १३ हद्दपारीची अंमलबजावणी सुरू आहे. वर्षभरात जिल्ह्यात एकाच घटनेत तिघांची हत्या केल्याची एकही घटना पोलीस दप्तरी नोंद नाही.
धाडसी घटनांची नोंद
गेल्या वर्षी २८ जानेवारी २०२० रोजी रात्री महामार्गावरील किणी टोल नाक्यावर पोलीस व गुंडांत गोळीबाराचे थरारनाट्य घडले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व सहा. पो. नि. सत्यराज घुलेसह त्यांच्या पथकांनी पुणे-राजस्थानमधील बिष्णोई टोळीचा पाठलाग करत त्यांना कंठस्नान घालण्याचा प्रयत्न केला. गुंडांच्या अंदाधुंद गोळीबारालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या धाडसी कर्तृत्वाची नोंद म्हणून कायम राहिली.
जिल्ह्यातील गुन्हेगारांचे अद्ययावत रेकॉर्ड करण्याचे काम सुरू आहे. फरारींच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानेही त्यांची पडताळणी सुरू आहे.
-शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर